🔘कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
🔘महाराष्ट्रातील सहा ठिकाणी ईएसआयसीद्वारे १०० खाटांची रुग्णालये उभारण्यात येणार
🔘पुणे येथील ईएसआयसी रुग्णालयाचे ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात रूपांतर करणार
🔘पुण्यातील ७ लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना होणार फायदा.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ईएसआयसी) देशभरात २३ नवीन १०० खाटांची रुग्णालये स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील पालघर, सातारा, पेण, जळगाव, चाकण आणि पनवेल येथे ही सहा रुग्णालये ईएसआयसीद्वारे उभारली जातील.या रुग्णालयांशिवाय ६२ ठिकाणी ५ डॉक्टर असलेले दवाखानेही सुरू करण्यात येणार आहेत.महाराष्ट्रात ४८ दवाखाने, दिल्लीत १२ दवाखाने आणि हरियाणामध्ये २ दवाखाने सुरू होणार आहेत.ही रुग्णालये आणि दवाखाने विमाधारक कामगारांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना ,त्यांच्या निवासस्थानाच्या जवळपासच्या परिसरात दर्जेदार वैद्यकीय सेवा पुरवतील आणि विमाधारकांना देण्यात येणाऱ्या उपायोजनांमध्ये देखील वाढ करतील.
दर्जेदार वैद्यकीय सेवा प्रदान करण्यासाठी, ईएसआयसी नवीन रुग्णालये स्थापन करत आहे आणि विद्यमान रूग्णालयांमध्ये सुधारणा करून पायाभूत सुविधांमध्ये वाढ करत आहे. नवीन रुग्णालये उभारण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेऊन, ज्या भागात ईएसआय योजना अंशत: अंमलात आणली आहे किंवा अंमलात आणली जाणार आहे किंवा जेथे ईएसआयसीच्या विद्यमान आरोग्य सेवा सुविधा मर्यादित आहेत अशा सर्व भागातील विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना ,आयुष्मान भारत पीएमजेएवाय संलग्नीकृत रुग्णालयांद्वारे रोकड विरहित (कॅशलेस )वैद्यकीय सेवांचा लाभ देण्याचा निर्णय ईएसआयसीने आपल्या बैठकीत घेतला आहे.या संलग्न व्यवस्थेद्वारे १५७ जिल्ह्यांतील ईएसआय योजनेचे लाभार्थी आधीपासूनच कॅशलेस वैद्यकीय सेवेचा लाभ घेत आहेत. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना उर्वरित जिल्ह्यांमध्ये कॅशलेस वैद्यकीय सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
ईएसआयसी द्वारे गेल्या आठ महिन्यांत विविध पदांसाठी ६४००रिक्त पदांची जाहिरात काढण्यात आली आहे ज्यामध्ये २ हजारहून अधिक डॉक्टर,शिक्षकांचा समावेश आहे, अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली.
पुण्यातील रुग्णालय ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात रूपांतर करणार
पुणे येथील सध्या २००खाटांच्या ईएसआयसी रुग्णालयाचे ५०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात रूपांतर करण्याच्या निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला. या रुग्णालयाच्या अद्ययावतीकरणामुळे पुण्यातील ७ लाख कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना फायदा होणार आहे.

