शाहीर विजय जगताप अमृतमहोत्सव गौरव समितीची पत्रकार परिषदेत माहिती
इचलकरंजी(प्रतिनिधी): इचलकरंजीचे सुपुत्र, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व सुप्रसिद्ध शाहीर विजय जगताप यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा इचलकरंजी येथील श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे शुक्रवार दि. २४ जून रोजी सायंकाळी चार वाजता आयोजित करण्यात आला आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर हे या समारंभाचे अध्यक्ष असून त्यांच्या हस्ते विजय जगताप यांना 'इचलकरंजी भूषण' पुरस्कार व अमृत महोत्सवी मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. माजी राज्यपाल व खासदार श्रीनिवास पाटील, सातारा हे प्रमुख पाहुणे असून त्यांच्या हस्ते शाहीर विजय जगताप यांचा 'विजयश्री' हा आत्मचरित्र ग्रंथ व 'अमृत महोत्सवी गौरव स्मरणिका' यांचे प्रकाशन होणार आहे. याचवेळी इचलकरंजीचे दिवंगत नामवंत शाहीर कै. राजाराम जगताप यांना मरणोत्तर 'इचलकरंजी भूषण' पुरस्कार दिला जाणार आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे, शिवाजी विद्यापीठाचे माजी मराठी विभाग प्रमुख डॉ. रवींद्र ठाकूर यांची उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शाहीर विजय जगताप अमृत महोत्सव गौरव समितीचे अध्यक्ष प्रताप होगाडे, उपाध्यक्ष पुंडलिक जाधव, मदन कारंडे, अहमद मुजावर, शशांक बावचकर, महादेव गौड, प्रसाद कुलकर्णी, प्रा. ए. बी. पाटील, अनिल डाळ्या यांनी इचलकरंजी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. याच दिवशी रात्री नऊ वाजता भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्त स्वातंत्र्यलढ्यातील गीते व पोवाडे यांचा "ही रात्र शाहिरांची' हा स्फूर्तिदायक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील व कर्नाटकातील शाहीर सहभागी होणार आहेत.
शाहीर विजय जगताप यांनी इचलकरंजीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे. देशातील दहा राज्यात त्यांचे तीन हजाराहून अधिक शाहिरीचे कार्यक्रम झाले आहेत. केंद्र शासनाच्या सीनियर फेलोशिपच्या अंतर्गत 'स्वातंत्र्यलढ्यातील राष्ट्रीय गीते व पोवाडे' या विषयाचा संशोधन प्रबंध सादर करून त्यांनी संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या 'शाहिरी व लोककला अकादमी' या संस्थेच्या माध्यमातून शाहिरी प्रशिक्षण शिबिरात आजवर दोन हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना शाहिरी कलेचे प्रशिक्षण दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळेच भारतातील पहिला शाहिरी अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठामध्ये सुरु झालेला आहे. इचलकरंजीतील एक अभ्यासू व कर्तव्यदक्ष नगरसेवक म्हणून त्यांनी ठसा उमटवला आहे. पाणीपुरवठा समितीचे सभापती असताना २०० हून अधिक कूपनलिका, नदीवरचा बंधारा, गैबी बोगद्याद्वारा पाणी आणणे याद्वारे शहराची तहान भागवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांची शाहिरी व अन्य सामाजिक विविध विषयावरील ४० पुस्तके प्रकाशित झाली आहेत. राज्य शासनाने त्यांना राज्यस्तरीय शाहिरी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. आपटे वाचन मंदिर, क्रांती शिक्षण संस्था, महाराष्ट्र साहित्य परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती आदी अनेक संस्थांतून पदाधिकारी म्हणून त्यांनी मोलाचे काम केले आहे. विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे झोकून देऊन काम करणारे शाहीर विजय जगताप यांचा अमृत महोत्सवी सत्कार 'शाहीर विजय जगताप अमृत महोत्सव गौरव समिती' च्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी विविध क्षेत्रातील स्थानिक मान्यवरांचा सहभाग असणारी समिती स्थापन करण्यात आली आहे. या अमृत महोत्सवी सत्कार सोहळ्यात इचलकरंजी शहर व परिसरातील नागरिकांनी तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील व सीमा भागातील सर्व शाहिरीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

