गडहिंग्लज (प्रतिनिधी) : सर्वच महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केली आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरात गेल्या अनेक वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रिया शिक्षण विभागामार्फत केंद्रीय पद्धतीने राबविले जाते. सदरची प्रक्रिया अत्यंत चांगली असून त्यामुळे हुशार व गुणवान विद्यार्थ्यांना त्यांना हव्या असलेल्या शिक्षण संस्थेत गुणवत्तेनुसार प्रवेश मिळतो. त्यामुळे ही योजना पालकांनाही उपयोगी ठरले आहे. परंतु ही प्रक्रिया फक्त गडहिंग्लज शहरातील कनिष्ठ महाविद्यालयनाच लागू असल्याने तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय यातून सुटतात व ते आपली प्रवेश प्रक्रिया आपल्या पद्धतीनुसार राबवितात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे ही प्रक्रिया संपूर्ण तालुक्यात किंवा विभागातील कनिष्ठ महाविद्यालयाना सक्तीची करावी असे मत डॉ.कुराडे यांनी व्यक्त केले आहे. अन्यथा सदरच्या प्रक्रियेतून शिवराज विद्या संकुलाचे संभाजीराव माने कनिष्ठ महाविद्यालय हे बाहेर पडून आपापली प्रवेश प्रक्रिया राबविणार असल्याचा इशाराही डॉ. अनिल कुराडे यांनी या पत्रकातून दिला आहे.
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही. चौगुले, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, जनसंपर्क अधिकारी प्रा. विक्रम शिंदे, रजिस्ट्रार संतोष शहापूरकर उपस्थित होते.