🔘 गडहिंग्लज तालुक्यातील ५९ शाळांचा निकाल शंभर टक्के
🔘कोल्हापूर विभागाचा एकूण निकाल ९८.५० टक्के
🔘आजरा तालुक्याचा निकाल ९९.५७ टक्के
🔘चंदगड तालुक्याचा निकाल ९९.५९ टक्के
🔘दहावीतही मुलींचीच बाजी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : गडहिंग्लज तालुक्याचा दहावीचा निकाल ९९.७३ टक्के इतका लागला. बारावी प्रमाणे इयत्ता दहावीतही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त दिसून आले. यामध्ये मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.५६ टक्के तर मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९९.९३ टक्के इतके दिसले. त्यामुळे दहावीतही मुलीच सरस असल्याचे पहावयास मिळाले. तालुक्यातील एकूण शाळांचा निकाल पाहिल्यास ५९ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी दुपारी एक वाजता आपल्या संकेत स्थळावर अधिकृत निकाल जाहीर केला. यामध्ये एकूण राज्याचा निकाल ९६.९४ टक्के इतका लागला. यंदाही सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोकण, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर अशा नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली. राज्यातही मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त दिसले. राज्यात यंदा दहावीच्या परीक्षा या ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष निकालाकडे लागले होते.
विभाग निहाय निकाल असा : कोकण ९९.२७, पुणे ९६.९६, नागपूर ९७, औरंगाबाद ९६.३३, मुंबई ९६.९४, कोल्हापूर ९८.५०, अमरावती ९६.८१, नाशिक ९५.९०, लातूर ९७.२७

