🔘पत्रकार परिषदेत दिली माहिती
हत्तरगी (नामदेव पंढरी) : बेळगाव जिल्ह्यात भाजपचे १२ आमदार, तीन खासदार व राज्यात भाजपची सत्ता असूनही वायव्य शिक्षक विधानपरिषद मतदारसंघातून माजी मंत्री, माजी खासदार प्रकाश हुक्केरी यांचा दणदणीत विजय झाला. माजी उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ,अन्न व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी प्रकाश हुक्केरी यांच्यावर टीका करूनही त्यांचा विजय झाला. यामुळे जिल्ह्यात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे केपीसीसीसी कार्याध्यक्ष व यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी बोलताना आमदार सतीश जारकीहोळी म्हणाले, प्रकाश हुक्केरी हे गेले चाळीस वर्षे राजकारणात आहेत. ते ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा पंचायत सदस्य, विधानपरिषद सदस्य, चारवेळा आमदार, खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. गतवेळच्या पेक्षा यावेळी मताधिक्य वाढले आहे.
वायव्य शिक्षक विधान परिषद मतदारसंघात बेळगाव, विजापूर, व बागलकोट जिल्ह्यातील मतदार आहेत. या जिल्ह्यात जादातर आमदार भाजपचे आहेत. बेळगाव जिल्ह्यात अठरा आमदार, तीन खासदार असून यापैकी बारा आमदार व तीन खासदार भाजपचे आहेत. असे असूनही काँग्रेस उमेदवार प्रकाश हुक्केरी यांना जादा मते मिळाली आहेत. डिसेंबरमध्ये झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत दोन जागांपैकी एक काँग्रेस व एक अपक्ष उमेदवार निवडून आला. असे सांगत आमदार जारकीहोळी यांनी याकडेही लक्ष वेधले.

