
होसुर (तालुका हुक्केरी) :येथे चोरट्यांनी घरावर दरोडा टाकत तिजोरीतील रोकड, दागिने लंपास केले.
हत्तरगी (वार्ताहर) : यमकनमर्डी पासून 12 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या होसुर (तालुका हुक्केरी) येथे चोरट्यांनी घरावर दरोडा टाकत मालुताई भिमराइ अक्कतंगेरहाळ या महिलेचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद यमकनमर्डी पोलीस स्थानकात झाली आहे.
याबाबत यमकनमर्डी पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी की, मयत मालुताई ह्या निवृत्त पीएसआय भिमराइ अक्कतंगेरहाळ यांच्या पत्नी आहेत. मालूताई यांचे पती भीमराई हे काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या दोन मुली बेंगलोर येथे नोकरीनिमित्त बाहेरगावी राहतात. मालुताई ह्या घरात एकटेच होत्या. याची संधी साधत चोरट्यांनी घरात प्रवेश करत त्यांना मारहाण केली. मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. चोरट्यांनी त्यांच्या घरातील रोकड, दागिने मिळून एक लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
दरम्यान, मालुताई यांच्या मुलीने घरी फोन केल्यानंतर घरातून कोणताच प्रतिसाद न आल्याने त्यांनी शेजाऱ्यांना कल्पना दिली. शेजाऱ्यांनी घरी जाऊन पाहिल्यानंतर मालुताई या मृतावस्थेत आढळल्या. याची कल्पना तातडीने यमकनमर्डी पोलिसांना देण्यात आली. पोलिस तातडीने घटनास्थळी दाखल झाले व तपास काम सुरू केले.
घटनास्थळी गोकाकाचे डीवायएसपी रमेशकुमार नाईक, यमकनमर्डीचे सीपीआय रमेशकुमार छायागोळ, यमकनमर्डीचे पीएसआय व्ही.बी .न्यामगौडर आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपासाबाबत पोलिसांना मार्गदर्शन केले. दरम्यान श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या खुनाबाबत अद्याप कोणतेही धागेदोरे सापडले नसुन पोलीस युद्धपातळीवर कसून तपास करत आहेत. या घटनेमुळे होसूर परिसरात खळबळ उडाली आहे.
