
तेरणी : विजयानंतर गुलालाची उधळण करत जल्लोष करताना राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार व समर्थक.
गडहिंग्लज: तेरणी येथील संगमेश्वर सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी विकास पॅनलचा दणदणीत विजय झाला. सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत सत्ताधाऱ्यांनी या निवडणुकीत मुसंडी मारली. विरोधी श्री करनाईक शेतकरी विकास आघाडीचा दारुण पराभव झाला.
सेवा संस्थेच्या यंदाच्या निवडणुकीत जनता दल व शिवसेना पुरस्कृत श्री करनाईक विकास आघाडी व राष्ट्रवादी पुरस्कृत राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. त्यातच काही अपक्ष उमेदवारही रिंगणात उतरल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. ह्या दोन्ही पॅनल समोर अपक्ष उमेदवारांचेही मोठे आव्हान होते . त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळाली. ही निवडणूक मोठी रंगतदार झाली. रविवारी सकाळपासून मोठ्या चुरशीने मतदान झाले . सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सत्ताधारी राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने मुसंडी मारत पुन्हा एकदा आपली सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळवले. विरोधी श्री करनाईक शेतकरी विकास आघाडीला एकही जागा न मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले.
निवडणूक निकालानंतर सत्ताधारी आघाडीच्या विजयी उमेदवारांसह समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत व गुलालाची उधळण करून मोठा जल्लोष साजरा केला.
विजयी उमेदवारांमध्ये इराप्पा चौगुले ,बापू जमादार ,मौलासो जमादार , अण्णासो देसाई ,नागेश देसाई ,शंकर निंबाळकर, बसवंत फडके, मल्लाप्पा भंगारी ,करवीर नावलगी ,साधना इंगवले ,वैशाली सुतार ,चंद्रप्पा कांबळे ,शिवाजी नाईक यांचा समावेश आहे.

