गडहिंग्लज : तेरणीसह पंचक्रोशीचे जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री करनाईक देवाच्या यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे. या निमित्ताने गावात भक्तिमय वातावरण तयार झाले असून गाव भाविकांनी फुलून गेले आहे.
गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागात जागृत देवस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री.करनाईक देवाची अख्यायिका ज्येष्ठांकडून व भाविकांकडून सांगितली जाते ती अशी : तेरणी गावच्या चार पिढ्यांच्या पाठीमागे इनामदारांच्या घरी करनाईक या नावाचा एक सदाचारी व सत्वशील माणूस नोकरीस होता. पुढे कालांतराने करनाईक व इनामदार यांच्यात वितुष्ट आले. दरम्यान करनाईक यांचे वाड्यात आकस्मिक निधन झाले. त्यानंतर इनामदार घराण्यावर विविध संकटे येऊ लागली .या संकटांच्या निवारणासाठी इनामदार घराण्याने कर्नाटकातील गोकाक तालुक्यातील आरभावी येथील मठाधिपती यांच्याकडे जाऊन त्यांनी येणाऱ्या संकटाची कल्पना दिली .यावेळी मठाधिपती यांनी इनामदार यांना वाड्यात आकस्मिक निधन झालेल्या सदाचारी व सत्वशील श्री.करनाईकांच्या भक्तीची आठवण करून देत त्यांची सर्वप्रथम पूजा करण्यात यावी व अन्य देवांचीही पूजा करण्यात यावी असे स्वामीजींनी सांगितले. हे ऐकून इनामदार यांच्यात श्री. करनाईक देवाची भक्ती जागी झाली . या भक्तीपोटी इनामदारांनी स्वमालकीच्या जमिनीत करनाईक देवाचे मंदिर बांधले. दरम्यान, शासनामार्फत तेरणी गावच्या हद्दीत लघु पाटबंधारे तलाव बांधण्याचे निश्चित झाले. या लघुपाटबंधारे तलावामुळे सदर मंदिर पाण्यात जाणार हे ग्रामस्थांच्या लक्षात आले . जुने मंदिरही जीर्ण झाले होते. यापार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी शासनाकडून मिळालेली रक्कम व लोकवर्गणीतून मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला व कमिटी स्थापन करण्यात आली. मंदिरासाठी गावातील दुंडाप्पा बसलींगप्पा ढब यांनी धरणाशेजारी असणारी आपली जमीन मंदिर बांधण्यासाठी दिली. ग्रामस्थ व पंचक्रोशीतील भाविक यांच्या लोकवर्गणीतून, देणगीदारांच्या सहभागातून धरणाच्या कमाल पाणीपातळी लगत कर्नाटकातील आरभावी दगडात नवीन मंदिर बांधण्यात आले आहे. लाल दगडात बांधण्यात आलेल्या या मंदिरात ग्रेनाईट दगडात करनाईक देवाची आकर्षक मूर्ती घडविण्यात आली आहे. श्री करनाईक देवाची हुबेहूब मूर्ती कारागिराने बनविली आहे.
दरवर्षी मे महिन्यात करनाईक देवाची यात्रा मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात येते. ह्या यात्रेचा दिवस हा बुधवार असतो. पंचक्रोशीसह पूर्वभागातील जागृत देवस्थान म्हणून श्री करनाईक देवाकडे पाहिले जाते. पूर्व भागातील भाविकांची श्री करनाईक देवांवर मोठी श्रद्धा आहे. नोकरीच्या निमित्ताने बाहेर राहणारे नोकरदार मंडळीसह अन्य भाविक दरवर्षी यात्रेनिमित्त गावाकडे येतात .यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. गाव गर्दीने फुलून जातो .गावात एक उत्साहाचे वातावरण तयार होते. कोरोनामुळे गेली दोन वर्षे भाविकांनी यात्रा साजरी केली नव्हती. यावर्षी ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण असून यात्रेसाठी गावात गर्दी झाली आहे .भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. यात्रेनिमित्त गावात विविध खेळण्यांची दुकाने व्यापाऱ्यांनी थाटली आहेत.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने योग्य नियोजन केले असून यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत. तसेच आज गावात विद्युत पुरवठाही सुरळीत रहावा यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गेले दोन दिवस वीज वाहिन्यांची दुरुस्ती करून घेतली आहे. वायरमन संतोष शिरगावे, संजय सावंत, करवीर ढब, सहदेव बामणे यांनी यात्रा कालावधीत भाविकांना अखंडित विद्युत पुरवठा व्हावा यासाठी दक्षता घेतली आहे. गावात यात्रेला उत्साहात प्रारंभ झाला आहे.


