गडहिंग्लज : प्रत्येक गावच्या पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार पूर्णतः महसूल खात्यामार्फत गावकामगार तलाठी व मंडल अधिकारी यांना मिळावेत या मागणीसह विविध सहा मागण्यांचे निवेदन गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी उपसभापती अरुणराव देसाई यांनी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांना तेरणी येथील एका कार्यक्रमात दिले.
या निवेदनात माजी उपसभापती श्री. देसाई यांनी म्हटले आहे की, ग्रामपंचायत हद्दीमधील रस्ता, सार्वजनिक ठिकाणावरील, खासगी शेतावरील अतिक्रमण काढण्याचा अधिकार पूर्णता ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे द्यावेत, सिटीसर्वे झालेल्या गावचे नकाशे लॅमिनेट करून ग्रामपंचायतीमध्ये प्रदर्शन करावेत. ग्रामपंचायतीला स्थानिक सार्वजनिक रस्ते, गटारी, वीज, पाणी, कचरा व्यवस्थापन इत्यादी नियमित आवश्यक कामांच्या पूर्ततेसाठी निधीची कमतरता भासते त्यामुळे खुली जागा, बांधकाम केलेल्या इमारतींची आकारणी चौरस मीटरचे दर नियमितपणे वाढवून ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना अधिकार मिळावेत, प्रत्येक गावांमधील लोकसंख्येनुसार आवश्यक बँकिंग व्यवस्था असावी. तेरणी, कळविकट्टे, बुगडीकट्टीच्या पंधरा हजार लोकसंख्याकरिता राष्ट्रीयकृत बँकेची शाखा तेरणी येथे सुरू करण्याचे नियोजन लीड बँकेच्या कमिटीमध्ये घेण्यात यावे, प्रत्येक गावामध्ये वाहनधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने दिवसा आणि रात्री उभी करत असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. आणीबाणीच्या वेळी एखाद्या ठिकाणी आग लागली असेल तर अग्निशमन वाहन जाणे शक्य नसल्याने मोठी वित्तहानी व जीवितहानीचा धोका निर्माण होत आहे. त्याच प्रमाणे वैद्यकीय आणीबाणीच्या वेळी रुग्णवाहिका सुद्धा पोचत नाही. परिणामी रुग्ण, अपघातग्रस्तांना वेळीच उपचार मिळणे मुश्कील होते. याकरिता अग्निशमन आणि रुग्णवाहिका जाण्या येण्यासाठी रुंद रस्ते असावेत, तेरणी आणि इतर गावाशेजारील सर्वेनंबरमध्ये होत असलेली बांधकामे नियमित बिगरशेती करुन मिळावीत. गावठाण हद्दपासून दोनशे मीटरच्या शासन राजपत्र प्रसिद्धी प्रमाणे ताबडतोब सर्व्हेक्षण करून सर्व सर्वे नंबर, गटनंबर मधील घरे, गोठे यांची बिगरशेती प्रॉपर्टी कार्ड तयार करून मिळावेत, गाई , म्हशी यासह इतर जनावरांच्या विमा उतरविण्या करीता शासकीय योजनेमधून निम्मी सबसिडी विमा हप्त्यांमध्ये मिळावी. यामुळे गरीब पशुपालकांना गाय व म्हैस दगावल्यास विमा रकमेमधून पुन्हा आर्थिक संरक्षण मिळण्यास मदत होईल आदी मागण्या माजी उपसभापती श्री. देसाई यांनी या निवेदनातून केल्या आहेत. याबाबत विचारमंथन करून आदर्श ग्राम व्यवस्था स्थापन करण्यासाठी कृती कार्यक्रम जाहीर करण्याची विनंती या निवेदनातून त्यांनी केली आहे.