तेरणी ग्रामपंचायतीचा नाविन्यपूर्ण उपक्रम ; 'तेरणी ग्रीड ॲप' आजपासून सेवेत
गडहिंग्लज : तेरणी ग्रामपंचायतीने तेरणी ग्रीड अँड्रॉइड ॲप विकसित केले असून याद्वारे ग्रामस्थांना आता थेट विद्युत खांबा खालील क्यूआर कोड स्कॅन करून पथदिव्यांची तक्रार ऑनलाईन नोंदविता येणार आहे. सदर ॲप आज सोमवार पासून सेवेत असल्याची माहिती सरपंच मोसिम मुल्ला, उपसरपंच आक्काताई हजेरी, ग्रामविकास अधिकारी अशोक शेळके यांच्यासह सदस्यांनी दिली.
तेरणी ग्रीड अँड्रॉइड ॲप स्मार्ट फोनमध्ये इन्स्टॉल केल्यानंतर आता ग्रामस्थांना आपल्या मोबाईलवरून गावातील पथदिव्यांची तक्रार थेट ऑनलाईन नोंदविता येणार आहे. ह्या ॲपच्या माध्यमातून गावात पोलची संख्या किती आहे व त्यावर कोणत्या प्रकारचा बल्ब आहे याचा सर्वे एनएसएस कॅम्पद्वारे करण्यात आला आहे.सर्व पोलना युनिक नंबर देण्यात आले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीच्या तक्रारी व त्यांचे योग्य लोकेशन ट्रेस करणे सोपे झाले आहे.एका पोलवर वर्षातून किती बल्ब बसवण्यात आले याचीही माहिती याद्वारे समजते.ग्रामस्थ फक्त एका मिनटात तक्रार नोंद करू शकतात. क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर तक्रार सिलेक्ट करा असा टॅब येतो. त्यात बल्ब बंद आहे, स्पर्किंग होत आहे, ट्रान्सफॉर्मर फेल झाला आहे, लाईन फोल्ट आहे व इतर असे ऑपशन आहेत. ग्रामस्थ आपल्या समस्यानुसार निवड करून सबमिट केल्यानंतर टेक्स्ट मेसेज वायरमन, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना जातो.
ग्रामस्थांना या माध्यमातून चांगली सोय झाली असून वेळीच तक्रारीचे निवारण होऊन समस्या मार्गी लागण्यास मदत होणार आहे. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे गावातून स्वागत होत असून ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. सदर ॲप ग्रामस्थांनी डाऊनलोड करण्याचे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे.