![]() |
बसर्गे : शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पार्थिवाला अकरा महिन्याची चिमुकली कन्या नियती हिच्याकडून भडाग्नी दिल्यानंतर उपस्थित जनसागराला अश्रू अनावर झाले. |
गडहिंग्लज (संतोष नाईक) : लडाख येथे बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेले वीर जवान नायक प्रशांत शिवाजी जाधव वय 27 यांच्यावर त्यांच्या मूळ गावी बसर्गे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी जवान प्रशांत जाधव यांची कन्या चिमुकली नियतीच्या आक्रोशाने उपस्थित जनसागराच्या अश्रूंचा बांध फुटला. मोठ्या जड अंतकरणाने बसर्गे ग्रामस्थांसह तालुक्यातील जनतेने वीरगती प्राप्त झालेल्या भारत मातेच्या या सुपुत्राला अखेरचा सलाम दिला.
शुक्रवारी लडाख येथील तूर्तुक सेक्टर मधील नदीपात्रात जवानांना घेऊन जाणारी बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जवान शहीद झाले होते. उर्वरित जखमी जवानांना तात्काळ हवाई दलाच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते. या भीषण दुर्घटनेत बसर्गे येथील जवान प्रशांत जाधव हे देखील शहीद झाले. हे वृत्त बसर्गे गावात समजताच गावावर शोककळा पसरली होती. गेली दोन दिवस शोकाकुल बसर्गे ग्रामस्थांसह नातेवाईक पार्थिवच्या प्रतीक्षेत होते.
रविवारी सकाळी बेळगाव येथील विमानतळावर शहीद जवान प्रशांत जाधव यांचे पार्थिव आल्यानंतर बेळगावचे पालकमंत्री गोविंद कारजोळ, आमदार अनिल बेनके यांच्यासह प्रशासनाने पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव मराठा लाईट इन्फंट्रीच्या कार्यालयात नेण्यात आले. तेथेही त्यांना मानवंदना देण्यात आली. पार्थिव बेळगावहून हलकर्णीमार्गे आणण्यात आले. तत्पूर्वी हलकर्णी येथील मुख्य चौकात पार्थिव आल्यानंतर हलकर्णीच्या सरपंच योगिता संगाज, उपसरपंच सलीम यमकनमर्डी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. त्यानंतर पार्थिव बसर्गे येथे रवाना करण्यात आले. यावेळी हलकर्णी पासून बसर्गे पर्यंत अंत्यदर्शनासाठी मोठ्याप्रमाणात जनसागर लोटला होता. शहीद जवान प्रशांत जाधव अमर रहे अशा घोषणा दिल्या जात होत्या. बसर्गे गावात पार्थिव दाखल झाल्यानंतर शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या निवासस्थानी सदर पार्थिव नेण्यात आले. तेथे काही काळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी हायस्कूलच्या मैदानाकडे पार्थिव आणण्यात आले. हायस्कूलच्या मैदानावर अंत्यसंस्कारासाठी चबुतरा तयार करण्यात आला होता. सर्व लोकांना अंत्यदर्शन व्हावे यासाठी मैदानावर योग्य नियोजन करण्यात आले होते. पार्थिव मैदानावर आणल्यानंतर काहीकाळ अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, माजी मंत्री भरमु पाटील, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे, माजी पंचायत समिती सदस्य बाळेश नाईक, रियाजभाई शमनजी, बसर्गेच्या सरपंच भारती रायमाने आदींनी पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, गटविकास अधिकारी शरद मगर, पोलीस निरीक्षक रविंद्र शेळके, मंडल अधिकारी विजय कामत,माजी पंचायत समिती सदस्य विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे, माजी जि. प. सदस्य रेखाताई हत्तरकी, सदानंद हत्तरकी, राष्ट्रवादीच्या जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष डॉ. गंगाधर व्हस्कोटी, माजी जि.प. सदस्य जयकुमार मुन्नोळी, बसवराज आजरी, अमर चव्हाण, वर्षादेवी नाडगोंडे सरकार यांच्यासह इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पार्थिव चबुतऱ्यावर ठेवण्यात आल्यानंतर वीर पत्नी पद्मा, वीर पिता माजी सैनिक शिवाजी जाधव यांना शहीद जवान प्रशांत यांचे मुखदर्शन देण्यात आले. यावेळी त्यांनी केलेल्या आक्रोशाने उपस्थित जनसागराच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या. जणू अश्रूंचा बांधच फुटला. त्यानंतर मराठा लाईट इन्फंट्रीच्या जवानानी मानवंदना दिली. वडील शिवाजी व कन्या नियती यांनी वीर जवान प्रशांत जाधव यांना भडाग्नी दिला.
जवान प्रशांत जाधव यांचा मनमिळावू स्वभाव
शहीद जवान प्रशांत जाधव यांचे बीएससी पर्यंत शिक्षण झाले होते.२०१४ मध्ये बेळगाव येथील 22 मराठा लाईट इन्फंट्री मधून सैन्यदलात ते दाखल झाले. 2020 मध्ये अर्जुनवाडी येथील पद्मजा यांच्याशी त्यांचा विवाह झाला आहे. त्यांना अकरा महिन्याची नियती ही कन्या आहे. जवान प्रशांत यांचा बसर्गेसह परिसरात मोठा मित्र परिवार होता. नेहमी ते सुट्टीवर आल्यानंतर आपल्या मित्र परिवारात मिळून-मिसळून असायचे. लडाखमधील दुर्घटनेत जवान प्रशांत यांचा मृत्यू झाल्याचे समजताच मित्रपरिवारासह बसर्गे ग्रामस्थांवर शोककळा पसरली. जवान प्रशांत जाधव यांनी सुट्टीवर गावी आल्यानंतर आपल्या मित्राच्या लग्नसमारंभात केलेला डान्स तसेच आपली कन्या नियती हिला घरी मोठ्या आनंदाने खेळवतानाचा व्हिडिओ गेली दोन दिवस व्हायरल झाल्याने त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. हे व्हिडिओ पाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले.
जवान प्रशांत एकुलते एक
शहीद जवान प्रशांत जाधव हे माजी सैनिक शिवाजी जाधव यांचे एकुलते एक सुपुत्र होते. प्रशांत यांना तीन बहिणी आहेत. जवान प्रशांत यांना पॅरा कमांडो होण्याची फार इच्छा होती. यासाठी त्यांची निवड देखील झाली होती व प्रशिक्षणही सुरू झाले होते मात्र अचानक घडलेल्या या दुर्घटनेत ते शहीद झाल्याने त्यांची इच्छा अपुरी राहिल्याने हळहळ व्यक्त होत होती.
विधवा प्रथा बंदीचा निर्णय
कोल्हापूर जिल्ह्यात हेरवाड गावाने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात सर्वत्र ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या कुटुंबियांनीही एक पाऊल पुढे टाकत विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला. यासंदर्भात बसर्गे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी व गावातील ज्येष्ठ मंडळींनी दोन दिवसापूर्वीच ग्रामस्थांना कल्पना दिली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या उपस्थितीत याची अधिकृत घोषणा यावेळी करण्यात आली.
शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी आजी-माजी सैनिक संघटनेचे विविध गावचे पदाधिकारी तसेच तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
![]() |
बसर्गे : शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या अंत्यदर्शनासाठी लोटलेला जनसागर. |