गडहिंग्लज : जनतेला आवश्यक सर्व शासकीय दाखले तसेच त्यांच्या विविध समस्या गावपातळीवरच सोडवण्यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम राबविला जात आहे. या माध्यमातून जनतेच्या विविध अडीअडचणी तातडीने सोडवण्याचा प्रयत्न शासन करत आहे. जनतेनेही निसंकोचपणे आपल्या समस्या व अडचणी मांडाव्यात विनाविलंब यावर कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी दिली. तेरणी येथे पाच गावांसाठी आयोजित शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या उदघाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी तेरणी सह हलकर्णी,बुगडीकट्टी, कवळीकट्टी, तूपूरवाडी गावासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम येथील मराठी विद्या मंदिरात राबविण्यात आला.या उपक्रमाला जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले.
यावेळी तहसीलदार दिनेश पारगे, कृषी अधिकारी अनिल फोंडे, सहाय्यक गटविकास अधिकारी आनंद गजगेश्वर , निवासी नायब तहसीलदार राजेंद्र यादव , तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला, बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई, तूपूरवाडीच्या सरपंच सौ.स्मिता पाटील, कळविकट्टेच्या सरपंच सौ.संगीता कांबळे उपस्थित होते.प्रारंभी स्वागत सरपंच मोसिम मुल्ला यांनी केले.
प्रारंभी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होताच बुगडीकट्टी विद्यामंदिरच्या झांज पथकाने आकर्षक झांज वाद्य सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या झांज पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी चंदगडचे शाहीर श्रीपती कांबळे यांनी विविध शासकीय योजनांचे प्रबोधन आपल्या शाहीरी गीतातून करत उपस्थित नागरिकातून वाहवाह मिळविली.
यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे पुढे म्हणाले, तेरणी येथे पाच गावांसाठी शासन आपल्या दारी या अभियानाचे संयोजकांकडून नेटके नियोजन करण्यात आले. हे अभियान जनतेसाठी असून जनतेने याचा पुरेपूर लाभ उठविणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील जनतेला विविध अडचणी व समस्या असतात त्या समस्या त्यांच्या गावच्या ठिकाणीच सोडविल्या जाव्यात. त्यांचा वेळ, पैसा याची बचत व्हावी हा या योजनेमागील हेतू आहे. शेतकऱ्यांना भेडसावत असलेल्या पानंद रस्त्यांचा प्रश्न वेळच्यावेळी मार्गी लावला जाईल. ज्या ठिकाणी पानंद रस्त्याची समस्या उद्भवली असेल तेथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी यांना सांगावे आम्ही तातडीने हे पाणंद रस्ते खुले करून देऊ. तसेच काही ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याच्या तक्रारी आहेत या संदर्भात कारवाईचे आदेशही दिले असून हा विषय गांभीर्याने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना वेळेत दाखले देण्यासाठी प्रयत्नशील
उपविभागातील विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखले वेळेत मिळण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत. विद्यार्थ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील. विद्यार्थी हा आपला प्राधान्य घटक आहे. विद्यार्थ्यांचे विविध शैक्षणिक दाखले व त्यांच्या अन्य समस्या सोडवण्यासाठीआपण त्यांच्यासाठी रात्रंदिवस उपलब्ध आहोत. असे यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. वाघमोडे यांनी सांगितले.
वृद्धांची हेळसांड करणाऱ्यांची गय नाही
सध्या वृद्धांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र दिसत आहे असे सांगत उपविभागीय अधिकारी श्री वाघमोडे म्हणाले, वृद्ध आई-वडिलांचा सांभाळ करण्यास सुशिक्षित पिढीच कचरत असल्याचे दिसत आहे अशा काही तक्रार अर्ज आपल्याकडे आल्याचे सांगत श्री वाघमोडे यांनी वृद्ध आईवडिलांची पाल्यांकडूनच सांभाळ होत नसल्याचे दिसत आहे यामध्ये सर्वात शरमेची बाब म्हणजे सुशिक्षित लोकांकडूनच असे प्रकार होत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. वृद्ध माता-पित्यांचा सांभाळ न करणाऱ्या पाल्यावर पोटगीचा कायदा संमत करण्यात आला आहे . उपविभागात वृद्धांच्या अशा कोणत्याही तक्रारीअसतील तर त्यांनी थेटपणे तक्रार अर्ज द्यावेत त्यांच्यावर आपण योग्य ती कार्यवाही करून न्याय मिळवून दिला जाईल असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री वाघमोडे यांनी केले. सर्वांनाच आपली विविध शासकीय कामे करून घेण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी येणे शक्य नसते त्यामुळे जनतेने शासनाकडे येण्याऐवजी शासनच आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येत आहे त्यामुळे ह्या योजनेचा सर्वांनी पुरेपूर फायदा घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले.
रिक्त पोलीस पाटील पदे दोन महिन्यात भरणार
गडहिंग्लज उपविभागात सध्या 50 पोलीस पाटील पदे रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित गावातील जनतेची गैरसोय होत आहे हे लक्षात घेता सदर रिक्त पदे येत्या दोन महिन्यात भरण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.
तहसीलदार दिनेश पारगे म्हणाले,सर्व प्रकारचे शासकीय दाखले गावच्या ठिकाणी मिळावेत व जनतेची पायपीट थांबावी यासाठी शासन आपल्या दारी हा उपक्रम सुरू आहे. ह्या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेची सर्वाधिक कामे एकाच छताखाली व गावपातळीवरच व्हावीत हा शासनाचा हेतू आहे, त्यामुळे संबंधित भागातील जनतेने या योजनेचा फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रलंबित कामे तातडीने सोडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून जनतेची जास्तीत जास्त विविध शासकीय कामे करून देणे हाच उद्देश शासनाचा आहे त्यामुळे जनतेनेच आपली प्रलंबित कामे ,विविध समस्या घेऊन यावे त्या आपण प्राधान्याने सोडवू असे सांगितले.
यावेळी बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई यांनी आपल्या मनोगतात आपल्या भागातील काही समस्या मांडल्या व अधिकाऱ्यांचे याकडे त्यांनी लक्ष वेधले. दरम्यान माजी उपसभापती अरुणराव देसाई यांनी विविध समस्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी वाघमोडे यांच्याकडे सुपूर्द केले व याकडे लक्ष घालून तातडीने या समस्या सोडविण्याची मागणी केली. यावेळी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांचा सत्कार तेरणीचे सरपंच मोसिम मुल्ला यांच्या हस्ते तर तहसीलदार दिनेश पारगे यांचा सत्कार बुगडीकट्टीचे सरपंच दयानंद देसाई यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सेवानिवृत्त राजपत्रित अधिकारी सुरेश लांडे, तसेच लक्ष्मण बोलके, सागर आसवले, कमीत कमी वेळेत प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत घर बांधल्या बद्दल मारुती कतीगार यांचा विशेष सत्कार उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच यावेळी आरोग्य विभागाच्या नीता कोरे, नीलिमा धबाले, जयश्री कांबळे, तलाठी धनश्री गवते, तलाठी शाजमीन शेख, बुगडीकट्टीचे उपसरपंच मायाप्पा धनगर, हलकर्णीचे उपसरपंच सलीम यमकनमर्डी,तेरणीचे उपसरपंच अक्काताई हजेरी यांच्यासह इतरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान यावेळी रेशन धान्य दुकानदारांना व तेरणी ग्रामपंचायतीला आयएसओ प्रमाणपत्र मिळाल्याबद्दल प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी विविध शासकीय दाखले तसेच प्रमाणपत्रांचे वाटप उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हलकर्णी अंगणवाडीच्या मुलांना गणवेश वाटप तसेच कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचे वाटप तसेच बचत गटांना कर्ज मंजुरीचे पत्र , इश्रमकार्ड वाटप , एकात्मिक बाल विकास विभागाच्यावतीने बेबी केअर किटचे वाटप यावेळी उपविभागीय अधिकारी श्री. वाघमोडे यांच्या हस्ते झाले.
यावेळी विस्तार अधिकारी किरण खटावकर ,भीमराव गोवंदे, सुमेश जेजरवार, पशुसंवर्धन विभागाचे विलास गुजर , मंडल अधिकारी विजय कामत, तेरणी पोस्ट कार्यालयाचे करवीर नावलगी ,पोलीस पाटील गंगाराम पाटील,तेरणीचे ग्रामसेवक अशोक शेळके ,कळविकट्टेचे ग्रामसेवक शशिकांत कुंभार , तूपूरवाडीचे ग्रामसेवक मारुती नांगरे , हलकर्णीचे ग्रामसेवक निवृत्ती कोंडुसकर, चंदनकुडचे ग्रामसेवक सतीश लोंढे , तलाठी किरण आंबुलकर, जयश्री कांबळे, वैजनाथ मुंगारे, शाजमीन शेख, धनश्री गवते,सी एच ओ डॉक्टर अशरफ शेख ,आरोग्य सहाय्यक श्री कुंभार, जयश्री कांबळे तसेच रेशन धान्य दुकानदार आप्पासाहेब टोणपी, दीपक नाईक, जोतिबा राजगोळे, रामा बड्यागोळ , दुंडाप्पा चौगुले, महेश मगदूम, श्री बिरंजे यांच्यासह बसर्गे बुद्रुकचे कोतवाल शिवानंद कटकोळी, येणेचवंडीचे कोतवाल शिवाजी कुराडे, तेरणीचे कोतवाल भीमा इंगवले, बुगडीकट्टीचे कोतवाल दशरथ कुणके ,हलकर्णीचे कोतवाल शंकर भोसले, नंदनवाडचे कोतवाल शिवाजी तूपूरवाडी, तेरणी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य तसेच कर्मचारी रेहमान ताशीलदार, करवीर भोई, सुरेश भोई, शिवमल कांबळे, सिद्धाप्पा धनगर,कवळीकट्टी ग्रामपंचायतीचे कर्मचारी ज्ञानेश्वर कांबळे , बुगडीकट्टीचे सुरेश बाळकर, हलकर्णीचे बापू वाजंत्री, बचत गटाच्या सीआरपी सानिया मुल्ला, सुविधा केंद्राचे प्रमुख दीपक कांबळे, घरकुल विभागाचे विनायक कल्याणी, एचडीएफसी बँकेचे प्रतिनिधी ,सुपरवायझर नंद्याळी मॅडम, अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर्स,मंडप डेकोरेटर्स हसन मुल्ला, केटरिंग विभागाचे किरण चौगुले , संतोष शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश दास यांनी केले.
शासन आपल्या दारी या उपक्रमात तहसील कार्यालय, पंचायत समिती आरोग्यविभाग , सामाजिक वनीकरण, एकात्मिक बाल विकास, भुमी अभिलेख, ग्रामपंचायत विभाग, कृषी विभाग, पशुवैद्यकीय, राज्य परिवहन मंडळ, पंचायत समिती, पोस्ट कार्यालय, पाटबंधारे, राज्य वीज वितरण कंपनी, दुय्यम निबंधक सहकारी संस्था व वन विभागाने सहभाग नोंदवून जनतेच्या विविध समस्या ऐकून घेत त्यांना लागणारे विविध शासकीय दाखले वितरित करण्यात आले. या शिबिरासाठी तेरणी, कळविकट्टे, बुगडीकट्टी, हलकर्णी, तूपूरवाडी ह्या 5 गावच्या ग्रामस्थांनी विविध दाखले मिळविण्यासाठी गर्दी केली होती.
![]() |
| तेरणी : येथे आयोजित शासन आपल्या दारी या कार्यक्रमास पाच गावातील ग्रामस्थांनी गर्दी केली होती. |



