गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हिडदुग्गी केंद्र शाळेत विद्यार्थ्यांना फास्ट फूड पासून दूर ठेवून पौष्टिक अन्नघटक खाण्याची सवय लागावी यासाठी 'भाकरी डे' हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. याला विद्यार्थी व पालकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सध्या आहाराच्या सवयी झपाट्याने बदलताना दिसत आहेत. कमी वेळेत आणि लवकरात लवकर खायला मिळावे ही अपेक्षा मनात धरून सर्वजण 'फास्टफूड'च्या आहारी जाताना दिसत आहेत. लहानापासून ते थोरापर्यंत सगळ्यांचेच फास्टफूड खाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. घरात आणि शाळेतसुद्धा मुले फास्टफूडवर यथेच्छ ताव मारताना दिसत आहेत. मात्र अशा या फास्टफूडच्या अतिसेवनामुळे लहान मुलांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, आरोग्यविषयक अनेक गंभीर परिणामांना मुलांना सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये पोटांचे विकार , अपचन तसेच भुकेची समस्या मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे आहारामध्ये पौष्टिक अन्नघटकांचा अभाव होय. या सर्व गोष्टींचा विचार करून मुलांना पौष्टिक अन्नघटकांची माहिती व्हावी आणि पूरक व पोषक आहार याचे महत्त्व कळावे म्हणून एक आगळावेगळा असा नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शाळेत 'भाकरी डे' उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुलांमध्ये पौष्टिक आहाराची सवय लागावी म्हणून सर्व मुलांनी घरातून ज्वारी, बाजरी, तांदूळ नाचणी, मका यांच्या भाकऱ्या शाळेत आणल्या होत्या. या माध्यमातून फास्टफूड पासून दूर राहून पारंपारिक आणि पौष्टिक अशा धान्यांचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. सदर उपक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक विकास पाटील, अध्यापक सचिन गवळी, शिक्षण सहाय्यक पूजा गोइलकर यांनी विशेष परिश्रम घेतले.


