व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे हे विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): राज्य शासनाने आणलेल्या जनसुरक्षा विधेयका विरोधात आज गडहिंग्लज येथे प्रांत कार्यालयासमोर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) वतीने निदर्शने करण्यात आली. तातडीने हे विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने अलिकडेच जनसुरक्षा विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकामुळे शासन कोणत्याही व्यक्तीवर आरोप ठेऊन त्यांच्यावर अटकेची कारवाई करू शकते. या विधेयकामुळे व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येत असून डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांनी घटनेतून दिलेल्या हक्कांची पायमल्ली होत आहे. लोकशाही पद्धतीने शासन प्रणालीत अशा प्रकारचे विधेयक म्हणजे हुकुमशाही पद्धतीचा अवलंब केल्यासारखे आहे. मनमानीप्रमाणे या कायद्याचा वापर विरोधकासाठी केला जाण्याची भिती आहे. त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र असंतोष आहे, त्यामुळे शासनाने हे विधेयक तत्काळ मागे घ्यावे अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.
यावेळी जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सह संपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवराज पोवार, युवा सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, जिल्हा महिला संघटिका शांता जाधव, उपतालुकाप्रमुख वसंत नाईक, श्रीशैलाप्पा साखरे, शहर प्रमुख प्रकाश रावळ, मारुती जाधव, सुधाकर जगताप, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील, प्रकाश जाधव, सागर हेब्बाळे आदींसह शिवसैनिक व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


