ठाकरे शिवसेनेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळांसोबत संयुक्त बैठक घेण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी गडहिंग्लज येथील मार्केट यार्ड समोरील पाडण्यात आलेली स्वागत कमान पूर्ववत उभी करण्यासाठी राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळासोबत संयुक्त बैठक घेण्यात यावी अशी मागणी शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) वतीने पालिका मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे निवेदनातून केले आहे. कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांच्या नेतृत्वाखाली सदर निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहराची रचना आणि संस्कृती खूप वेगळी आहे. १९६० च्या दशकात तत्कालीन नगराध्यक्ष डॉ. एस. एस. घाळी जपान दौऱ्यावर गेले होते. तेथील एका शहरात प्रवेश करताना त्यांच्या नजरेत स्वागत कमान आली. तो विषय त्यांच्या मनात पक्का बसला अशाच प्रकारची कमान गडहिंग्लज शहरात उभी करायची हा निर्धार करूनच ते आले, आणि वर्षभरातच मार्केटयार्ड परिसर म्हणजेच शहराचे प्रवेशद्वार त्या ठिकाणी भव्य कमानीची उभारणी केली. ही प्रवेश कमान म्हणजे शहराच्या वैभवात भर घालणारी ओळख ठरली. संकेश्वरकडून येणाऱ्या सर्वच वाहनांचे स्वागत या प्रवेश कमानीत होते. बस गाडयाचा थांबाही याच ठिकाणी करण्यात आल्याने गडहिंग्लजची ओळख आणखी ठळक झाली.
ही पार्श्वभूमी लक्षात घेता संकेश्वर- बांदा नवीन राज्यमार्ग तयार झाल्याने आणि तो शहरातून गेल्याने या रस्त्याच्या कामासाठी शहराची ओळख असलेली कमान राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडून पाडण्यात आली. त्यामुळे शहराची ओळख पुसली गेली. ही कमान पाडली जाऊ नये अशी भुमिका काही संघटनांनी त्याचवेळी मांडली होती. परंतू त्याकडे दूर्लक्ष करून भव्य कमान पाडण्यात आली. त्यामुळे राष्ट्रीय रस्ते विकास महामंडळाशी संपर्क साधून तातडीने संयुक्त बैठक घ्यावी आणि पाडण्यात आलेली सदर स्वागत कमान पूर्ववत उभी करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे. अन्यथा या तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
निवेदनावर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सह संपर्कप्रमुख रियाजभाई शमनजी, जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने, अजित खोत, आजरा तालुका प्रमुख युवराज पोवार, युवा सेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख अवधूत पाटील, श्रीशैलाप्पा साखरे, शहर प्रमुख प्रकाश रावळ, मारुती जाधव, उप तालुकाप्रमुख वसंत नाईक, सुधाकर जगताप, सुरेश हेब्बाळे, संजय पाटील, प्रकाश जाधव, सागर हेब्बाळे, दिगंबर पाटील, बाळू कुंभार, मनीष हावळ, कृष्णात कांबळे, विनोद पाटील आदींच्या सह्या आहेत.


