गडहिंग्लज नगरपालिका कामगार युनियनची मागणी
माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वातीताई कोरी यांच्या नेतृत्वाखाली निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): दिवाळी सणासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी गडहिंग्लज नगरपालिका कामगार युनियनच्या वतीने पालिकेकडे करण्यात आली आहे. सदर निवेदन जनता दलाच्या नेत्या व माजी नगराध्यक्षा प्रा. सौ. स्वातीताई कोरी यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. सदर निवेदन कार्यालय अधीक्षक सारिका खोत यांनी स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यातील पुणे विभागामधील इतर नगरपरिषदांमध्ये दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान दण्यात येते. त्याचप्रमाणे गडहिंगनज नगरपरिषदेमध्ये सुध्दा गेली ५ ते ६ वर्षापासून सानुग्रह अनुदान दिले जात आहे.
गडहिंग्लज नगरपरिषदेला यावर्षी 'माझी वसुंधरा अभियान' मध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या योगदानामुळे नगरपरिषदेला ५ कोटीचे बक्षीस मिळाले आहे. यापूर्वी संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानमध्ये पुणे विभागामध्ये प्रथम क्रमांक तसेच राज्य शासनाचा वनश्री पुरस्कार मिळालेला आहे. चालू वर्षी स्वच्छ सर्वेक्षणा अंतर्गत स्पर्धेत देशाच्या पश्चिम भागातील स्वच्छ शहराचा दुसरा क्रमांक मिळाला व माझी वसुंधरा व मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धेतून तब्बल ७ कोटीची बक्षिसे गडहिंग्लज शहरास मिळवून देण्यास कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
त्याचबरोबर शासनाच्या स्वच्छता अभियान, प्लॅस्टिक बंदी, अतिक्रमण काढणे, गणेशोत्सव, वृक्षारोपण, क्रीडामहोत्सव, लोकशिक्षण व्याख्यानमाला, जागतिक महिला दिन यासारख्या सामाजिक कार्यक्रमामध्ये तसेच नैसगिक आपत्तीमध्ये वेळेचे बंधन न पाळता येथील कर्मचारी नियमित काम सांभाळूम ही अतिरिक्त कामे करीत असतात. अशा विविध कामाकरीता कामगारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी इतर नगरपरिषदांप्रमाणे गडहिंग्लज नगरपरिषदेने सुध्दा कर्मचाऱ्यांना दिवाळी सणाकरीता २५ हजार रुपये इतके सानुग्रह अनुदान मिळावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, नितीन देसाई, शशिकांत मोहिते, धनंजय चव्हाण, रोहित वाघमारे, प्रवीण पाटील, शारदा सातपुते, अनुराधा सावरे यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.


