जिल्हाधिकाऱ्यांना ग्रामस्थांच्या वतीने निवेदन
![]() |
| कोल्हापूर: निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली याना निवेदन देताना बाळकृष्ण रावण, एस. बी. पाटील ,विनोद मोकाशी, एम ए. शिंदे, तानाजी नार्वेकर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नांगनूर ( ता. गडहिंग्लज) येथील ग्रामस्थांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी पाणीपुरवठा योजनेला जलशुद्धीकरण संयंत्र बसवावे या मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी निवेदन स्वीकारले.
निवेदनात म्हटले आहे की, शासनाच्या नळ योजनेद्वारे पुरवठा होत असलेले नदीचे पाणी पिण्यायोग्य नाही. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी गावापासून दूरवरील खासगी विहीर, बोअरवेल इत्यादीचा आधार घ्यावा लागत आहे. काही प्रमाणात पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागते. वयस्कर, ज्येष्ठ व्यक्ती, वृद्ध महिला व आजारी असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. नदीमध्ये संकेश्वर शहरातील दूषित पाणी थेट मिसळते. तसेच साखर कारखान्याचे मळीयुक्त, रसायनियुक्त दूषित पाणी सोडले जाते त्यामुळे गावात नदी, विहीर, बोरवेल यांना सुद्धा शुद्ध पाणी मिळत नाही. साखर कारखान्याला दंड देखील झाला आहे पण या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नाही. पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी नळ योजनेचे पाणी जलशुद्धीकरण संयंत्रद्वारे शुद्ध करून पाण्याचा पुरवठा व्हावा, अशी मागणी या निवेदनातून केली आहे. निवेदनासोबत आमदार शिवाजीराव पाटील यांचे शिफारस पत्र, ग्रामपंचायत नांगनूर यांच्या प्रशासकीय समिती ठरावाची प्रत सोबत जोडली आहे.
निवेदनावर तानाजी नार्वेकर, शिवाजी पाटील, आप्पा जाधव, एम. ए. शिंदे, बाळकृष्ण रावण, संभाजी बाबू पाटील, विनोद मोकाशी, संभाजी दादू पाटील, रमेश रावण आदींच्या सह्या आहेत.


