भूमी अभिलेखचे जिल्हा अधीक्षक शिवाजी भोसले यांची माहिती
कोल्हापूर : जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर या पिठासनाकडे दाखल झालेली प्रकरणे जलद गतीने निपटारा करण्यासाठी येत्या 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कोल्हापूर, 2535 सी वॉर्ड, जुना बुधवार पेठ, कोल्हापूर येथे अधीनस्त सर्व उपअधीक्षक भूमि अभिलेख व नगरभूमापन अधिकारी यांच्याकडे प्रलंबित, अर्धन्यायीक प्रकरणांच्या निपटाऱ्यासाठी भूमि लोक अदालत आयोजित करण्यात आली आहे. या लोक अदालतीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पक्षकारांनी, विधी व्यवसायी यांनी 23 सप्टेंबर अखेर विहीत नमुन्यात संबंधित प्राधिकारी यांच्याकडे तडजोडीसाठी अर्ज दाखल करावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख शिवाजी भोसले यांनी केले.
यामध्ये अर्जांची पडताळणी करुन भूमि लोक अदालतीतील पक्षकारांचे समुपदेशन करुन तडजोडीसाठी मदत करण्यात येऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. भूमि अभिलेख विभागाकडे मोजणी, फेरफार अणि एकत्रिकरण योजनेमधील प्रकरणांबाबत कनिष्ठ न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयावर जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाकडे प्राप्त होणाऱ्या अपील प्रकरणांची संख्या जास्त आहे. या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होण्यासाठी जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांनी सुचना दिल्या. कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 690 अर्धन्यायीक प्रकरणे भूमि अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहेत. या भूमि लोक अदालतीमध्ये दोन्ही पक्षकार स्वयंप्रेरणेने अथवा वकीलामार्फत तडजोड करण्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करु शकतात.अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, कोल्हापूर, 29355, सी वॉर्ड, जूना बुधवार पेठ, कोल्हापूर, दूरध्वनी क्रमांक 0231-2543349 वर संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाध्यक्ष भूमि अभिलेख कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

