गेल्या २५ वर्षापासून लढा, अद्याप ४० टक्के पुनर्वसन बाकी : कॉ. शिवाजी गुरव
रखडलेले पुनर्वसन तातडीने पूर्ण करण्याची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आंबेओहोळ धरणग्रस्तांचे रखडलेले पुनर्वसन तातडीने पूर्ण करावे या मागणीसाठी धरणग्रस्त संग्राम संघटनेच्या वतीने गडहिंग्लज प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. कॉम्रेड शिवाजी गुरव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी निवासी नायब तहसीलदार विष्णू बुट्टे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, आंबेओहोळ धरणग्रस्तांचे पुनर्वसन गेली २५ वर्षे रखडलेले असून अद्याप ४० टक्के पुनर्वसन बाकी आहे. ज्यांना पुनर्वसनामध्ये जमिनी मिळाल्या त्या जमिनीच्या सात-बारा उताऱ्यांवर चुकीचा बोजा चढवला आहे तो कमी करण्यात यावा, कडगाव येथील पुनर्वसन वसाहतीमध्ये नागरी सुविधा देण्यात याव्यात, येथील काही भूखंड सकल भागात आहेत त्यांना भराव टाकून सपाटीकरण करून देण्यात यावे, वसाहतीच्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या इमारतीना खिडक्या, दरवाजे बसवण्यात यावेत, पूर्वीप्रमाणे दर बुधवारी किंवा पंधरा दिवसातून एकदा पुनर्वसनाची बैठक प्रांत कार्यालयात घेण्यात यावी व प्रगती आढावा घेण्यात यावा, करार झालेल्या शेतकऱ्यांना त्यांचे पैसे व्याजासह देण्यात यावीत, थोडे पैसे व थोडी जमीन घेतलेल्या धरणग्रस्तांना भूखंड देण्यात यावेत, पुनर्वसन न झालेल्या शेतकऱ्यांची व अर्धे पुनर्वसन झालेल्या शेतकऱ्यांची तसेच ज्यांना भूखंड मिळाले अशा दोन्ही वसाहती मधील धरणग्रस्तांची यादी मिळावी, प्रांत कार्यालयातून पुनर्वसन होण्यास वेळ लागत असल्याने कोल्हापूर जिल्हा पुनर्वसन कार्यालयाकडे कार्यभार सोपवण्यात यावे आदी मागण्या या निवेदनातून केल्या आहेत. निवेदनावर कॉम्रेड शिवाजी गुरव, पांडुरंग शिंदे, सदाशिव शिवणे, रोहिणी चौगुले, सखाराम कदम आदींच्या सह्या आहेत.



