आजरा (हसन तकीलदार) : विशाल नवार याने अंधत्वावर मात करीत आय. बी. पी. एस परीक्षा पास झाल्याबद्दल व लिंगवाडीचे सरपंच लहू वाकर यांना दैनिक पुढारी यांच्यावतीने दिला जाणारा पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवसेना उबाठा तर्फे त्यांचा जाहीर सत्कार करणेत आला.
आजरा तालुक्यातील गवसे येथील विशाल शिवाजी सुतार याने अंधत्वावर मात करीत आय. बी. पी. एस. परीक्षा उत्तीर्ण करून बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये क्लार्क पदावर झेप घेत यशाला गवसणी घातली. घरची परिस्थिती बेताची असताना केवळ जिद्दीच्या जोरावर विशालने इथपर्यंत मजल मारली. डोळ्यांची व्याधी असताना सुद्धा त्याच्या शिकण्याच्या इच्छेला घरच्यांनी विरोध केला नाही. त्याच्या पाठीशी खंबीर उभे राहिले. अशा परिस्थितीतसुद्धा त्याला मुंबईसारख्या शहरात शिकवले. त्याने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून यश संपादन केले.
लिंगवाडी येथील सरपंच परिषद मुंबईचे सदस्य व लिंगवाडी -किटवडेचे सरपंच लहू वाकर यांच्या अतुलनीय कार्याबद्दल दै. पुढारीचा पुरस्कार प्राप्त झाला. सरपंच परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले. वणवा निर्मूलन, वृक्ष लागवड, निसर्गाबद्दल जनजागृती यासारख्या विधायक कामांची दखल घेत हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल विशाल नवार, गवसे व लहू वाकर लिंगवाडी यांचा शिवसेना उबाठा तर्फे जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुकाप्रमुख युवराज पवार, उपतालुका प्रमुख शिवाजी आढाव, शाखा प्रमुख श्रावण वाकर, बिलाल लतीफ, विजय डोंगरे, अमित गुरव आदिजण उपस्थित होते.

