Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

तेरणीतील जुना कळविकट्टे रोडवरील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात ; गटारीतून काढलेला घाण व कचरा गेले दोन महिने पडूनच



गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील तेरणी गावांतील जुना कळविकट्टे रोडवरील गटारीतील काढलेली घाण व कचरा काढून  रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आले आहे. मात्र गेले दोन महिने झाले याची  उचल करून विल्हेवाट लावलेली नसल्याने येथील ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीने कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा येथे राहणाऱ्या रहिवाशांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिला आहे.



या पत्रकात म्हटले आहे की, जुना कळविकट्टे रोड ( धरणाकडे जाणारा रस्ता) या ठिकाणी गेली दोन महिने झाले फक्त  रस्त्याच्या पश्चिमेच्या बाजूची जेसीबीने गटार उकरून गटारीतील घाण, कचरा रस्त्याच्या कडेला ग्रामपंचायतीने टाकलेले आहे. काढलेली घाण व कचरा येथून उचल करून विल्हेवाट न लावल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. मुळातच रस्ता अरुंद आहे त्यात एका बाजूला हा कचरा काढून ठेवल्याने रहदारीलाही अडथळा होत आहे. पावसामुळे पुन्हा हा कचरा गटारीतच मिसळत आहे. येथील रहिवाशांना याचा प्रचंड प्रमाणात त्रास होत आहे. दुर्गंधी सुटल्याने येता-जाता नाक धरून जाण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. याबाबत रहिवाशांनी  वेळोवेळी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना, ग्रामपंचायत अधिकारी यांना टाकलेला घाण, कचरा उचलण्यासाठी विनंती केली असता करूया, बघूया अशीच उत्तरे देत आहेत. तेथील घाणीमुळे त्या ठिकाणी राहत असणाऱ्या लोक वस्तीला अनेक रोगराईला सामोरे जावे लागत आहे. ग्रामपंचायतीने या समस्येकडे आता दुर्लक्ष केल्यास आंदोलनासारखा मार्ग अवलंबवा लागेल असा इशारा येथील रहिवाशांनी या पत्रकातून दिला आहे. 



या पत्रकावर करवीर नंद्यापगोळ, करवीर बेळी, राजेसो गंधवाले, रामदास सुतार, बसवराज नावी, केदारी फडके, बसवंत फडके, सुबराव बेळी, निलेश नरेवाडी आदींच्या सह्या आहेत.


दरम्यान, याबाबत आमच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायत अधिकारी पी. बी. रावण यांच्याशी संपर्क साधला असता आपण याबाबत माहिती घेतो असे सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.