Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापुरात मराठमोळ्या सांस्कृतिक कार्यक्रमाने खुलला ‘जल्लोष माय मराठीचा’

लोककलेतून सादर झाला महाराष्ट्राचा सांस्कृतिक प्रवास


शासनामार्फत राज्य महोत्सवातून सामाजिक प्रबोधन – जिल्हाधिकारी




कोल्हापूर : सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई व जिल्हा प्रशासन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव राज्य महोत्सव अंतर्गत ’जल्लोष माय मराठीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दसरा चौकातील शाहू स्मारक भवन येथे अलंकार कला अकॅडमी फाउंडेशन मार्फत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक प्रवासाचे सादरीकरण विविध लोककलेतून सादर झाले.



यावेळी उद्घाटन सोहळ्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तहसीलदार स्वप्नील रावडे, तहसीलदार करमणूक तेजस्विनी पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राज्य गीताने व दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून उपस्थित कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यात राष्ट्रपती पदक प्राप्त कला शिक्षक सागर बगाडे, ग्रूप लीडर महेश सोनुले यांचा पुष्प देऊन सन्मान केला.



प्रशांत आयरेकर यांच्या निवेदनातून ५० कलाकारांचा सहभाग असलेल्या पारंपारिक नृत्य व गीतांच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. सांस्कृतिक कार्यक्रमात शाहू गौरव गीत, नमन, गणेश वंदना नृत्य, पोस्टमन, मंगळागौर, जोतिबाच्या नावाने चांगभलं, ओवी भूपाळी, वासुदेव नृत्य, बैलपोळा, शेतकरी, अष्टविनायक गीत, आदिवासी, भारुड, गण गवळण, पोवाडा, गोंधळ, मर्दानी खेळ तसेच राज्यभिषेक सादर करण्यात आला. 


शासनामार्फत राज्य महोत्सवातून सामाजिक प्रबोधन – जिल्हाधिकारी अमोल येडगे




राज्य शासनामार्फत गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला असून या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून सांस्कृतिक रंगत वाढविण्यासोबतच सामाजिक प्रबोधनालाही विशेष महत्त्व दिले जात आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले की, गणेशोत्सव हा केवळ उत्सव नसून समाजाला दिशा देणारे एक प्रभावी माध्यम आहे. शासनाच्या वतीने आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोककला, स्पर्धा आणि प्रबोधनपर उपक्रमांतून समाजजागृती साधली जात असून त्याचा व्यापक परिणाम होत आहे.


जिल्हाधिकारी म्हणाले की, गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरांमुळे जनतेच्या आरोग्याविषयी जागरूकता निर्माण होत आहे. प्रदूषणमुक्तीचे संदेश देऊन पर्यावरण संवर्धनाचे भान जनमानसात दृढ होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळ स्पर्धांच्या माध्यमातून सामाजिक संदेश देणाऱ्या सजावटी व देखाव्यांना प्रोत्साहन मिळत आहे. त्याचबरोबर पारंपरिक मराठी गीत व नृत्यांनी सजलेला ‘जल्लोष माय मराठीचा’ यासारखा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मराठी संस्कृतीचा वारसा जपण्याचा आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.



यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी असेही नमूद केले की, राज्य महोत्सवातील प्रत्येक उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडविण्यास हातभार लावत आहे. सांस्कृतिक वारसा, सामाजिक संदेश आणि आधुनिक जाणीवा यांचा संगम घडविणे हा राज्य महोत्सवाचा मुख्य उद्देश असून यशस्वी आयोजनातून समाजहित साध्य होत असल्याचे ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.