गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध अडचणी व मागण्यांबाबत सोमवार दिनांक १५ सप्टेंबर रोजी गडहिंग्लज व आजरा तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सदर आंदोलनात तालुक्यातील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीला संलग्न जमीनधारक शेतकरी तसेच इतर खाजगी ट्रस्टशी संबंधित सर्व देवस्थान शेतकरी सहभागी होणार आहेत.
सरसकट सर्व शेतकऱ्यांचा विनाअट खंड भरून घेण्यात यावा आणि देवस्थान शेतकऱ्यांचे पीक पाणी नोंद करून त्याचा लिखित उतारा या शेतकऱ्यांना तात्काळ देण्यात यावा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. सोमवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मोर्चाने येऊन तहसिलदार गडहिंग्लज यांना निवेदन देण्यात येणार आहे.
देवस्थान शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत योग्य व न्याय निर्णय व्हावा, ही अखिल भारतीय किसान सभेची आग्रही भूमिका आहे. अन्यथा या शेतकऱ्यांना अधिक आक्रमक व बेमुदत आंदोलन करण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा देण्यासाठी व मागण्यांची अंमलबजावणी होण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी कॉ. संग्राम सावंत, ॲड. दशरथ दळवी, कॉ.शिवाजी गुरव, लक्ष्मण पाच्छापुरे, संभाजी मोहिते, तानाजी यादव, सुभाष शिंदे, भगवान सूर्यवंशी, प्रवीण मुळीक, बाळू मांगले, शिवाजी बिरजे, परशुराम जाधव सरकार, सुरेश जाधव उपस्थित होते.

