एकुण दोन लाखांची पारितोषिके; स्पर्धेचे विसावे वर्ष
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे दिवाळी सुट्टीत अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले आहे. लोकवर्गणीतून होणा-या या युनायटेड करंडक स्पर्धेसाठी एकुण दोन लाख रुपयांची पारितोषिके आहेत. स्पर्धेत गोवा, केरळ, कर्नाटक, दिल्ली, पंजाबसह यजमान महाराष्ट्रातील संघाना निंमत्रित करण्यात आले आहे. एम. आर. हायस्कुलच्या मैदानावर होणा-या या स्पर्धेचे यंदाचे विसावे वर्ष आहे.
येथील अजित क्रीडा मंडळाने सत्तरच्या दशकात दिवाळीत आंतरराज्य स्पर्धेची परंपरा सुरु केली. त्यानंतर तालुका फुटबॉल असोसिएशन आणि सॉकरनंतर गेली दोन दशके गडहिंग्लज युनायटेड मार्फत हि स्पर्धा सुरु आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघ, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आणि कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनच्या मान्यतेने दिवीळीत हि स्पर्धा होणार आहे. स्पर्धेसाठी गोवा, केरळ, बंगळूर, दिल्ली, पंजाब आणि महाराष्ट्र अशा एकुण १६ संघाना निंमत्रित केले आहे. स्पर्धेतील सर्व संघाना प्रवासखर्चासह, निवास व भोजनाची सोय करण्यात आली असल्याची माहिती युनायटेडचे अध्यक्ष सुरेश कोळकी आणि उपाध्यक्ष सतिश पाटील यांनी दिली.
स्पर्धेसाठी सुमारे पंधरा लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यासाठी दानशुर क्रीडा प्रेमी, संस्थाकडे संम्पर्क साधला जात आहे. स्पर्धेसाठी एक ते चार क्रमांकाबरोबरच वैयक्तीक सहा अशी एकुण दोन लाख रुपयांची पारितोषिके आहे. स्पर्धा यशस्वी करणेसाठी मैदान, निवास, आर्थिक, भोजन, प्रसिध्दी, तांत्रिक, स्वागत अशा समिती करुन तयारी सुरु आहे. विसावे वर्ष असल्याने स्पर्धा अधिक रंगतदार होण्यासाठी स्थानिक खेळाडूंचे सराव शिबिराचे नियोजन आहे. स्पर्धा यशस्वी करणेसाठी युनायटेडचे सर्व संचालक, समन्वयक सुभाष पाटील, ओमकार जाधव आणि सहकारी परिश्रम घेत आहेत.
स्पर्धेचे द्विशतक
येथील दीवाळी सुट्टीतील स्पर्धेला अर्धशतकाची दैदिप्यमान परंपरा आहे. गेल्या दोन दशकापासून गडहिंग्लज युनायटेडने हि परंपरा चिकाटीने जपली आहे. ना हिरवळीचे मैदान ना अत्याधुनिक हॉटेल्सची सोय तरीही केवळ गडहिंग्जकरांच्या फुटबॉल प्रेमामुळे देशातील दीग्गज संघ स्पर्धेत हिररीरीने येतात. इंडियन लीग ( आय लीग) खेळणाऱ्या केरळचा एसबीटी, गोव्याचा स्पोर्टिंग, साळगावकर,वास्को स्पोर्ट्स, बंगळूरचा एचएएल, साऊथ युनायटेड, बीईएमएल, मुंबईचा ओनजीसी, पुणे एफसी या नामाकिंत संघानी स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. त्यामुळे युनायटेड करडंक म्हणजे अव्वल संघाची हजेरी हे समीकरण बनलेले आहे.