शिंदे शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षकांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज शहरातील मुख्य रस्त्यांवर चुकीच्या पद्धतीने वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी शिंदे शिवसेनेच्या वतीने पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरातून संकेश्वर-बांदा हा राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र शहरात गेल्या काही महिन्यापासून पुन्हा वाहतूक कोंडीत भर पडलेली आहे. कारण शहरातील पार्वती शंकर पतसंस्था ते वीरशैव चौक, दसरा चौक, भडगाव रोडवरील डॉक्टर कॉलनी देसाई हॉस्पिटल कॉर्नर, हती हॉस्पिटल चौक या परिसरात चुकीच्या पद्धतीने चार चाकी वाहनांचे मनमानी पार्किंग केले जात आहे. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असून परिणामी पुन्हा वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे अशा प्रकारे वाहने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर शहर संघटक काशिनाथ गडकरी, तालुकाप्रमुख संजय संकपाळ, शहर प्रमुख अशोक शिंदे, युवासेना तालुका संघटक सागर कांबळे, महिला तालुकाप्रमुख स्नेहलता बाडकर आदींच्या सह्या आहेत.