ठाकरे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेचे गटशिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
गडहिंग्लज (प्रतिनिधी): स्कुल बसला सी.सी.टी.व्ही कॅमेरे न बसवणाऱ्या शिक्षण संस्थावर कारवाई करावी अशी मागणी ठाकरे शिवसेनेच्या अवजड वाहतूक सेनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांच्याकडे निवेदनातून केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गडहिंग्लज शहरात अनेक शिक्षण संस्था आहेत व निर्माण होत आहेत. विद्यार्थ्यांना बालवाडी ते दहावीपर्यंत शिक्षणासाठी ने आण करण्यासाठी संस्था चालक आपल्या बसमधून करत असतात. एखादी घटना घडलीच तर पोलिसांना पुरावा म्हणून उपयोग व्हावा, मुलांचे संरक्षण व्हावे तसेच वाहन चालक व वाहक यांनी कशापध्दतीने सेवा देतात या हेतुने कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक स्कुल बसला सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसविण्याचे आदेश परिवहन अधिकारी चंद्रकांत माने यांनी दिले आहेत. त्यामुळे गडहिंग्लज शहर व तालुक्यातील संस्था चालक यांनी आपल्या स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही बसविणे बाबत लेखी सूचना द्याव्यात, न बसवणाऱ्या शिक्षण संस्था चालकांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून केली आहे.
निवेदनावर तालुकाप्रमुख पंकज चौगुले, शहरप्रमुख महेश भोसले, उपशहर प्रमुख कृष्णात कांबळे आदींच्या सह्या आहेत.