गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प ; तालुक्याच्या पूर्व भागाचाही संपर्क तुटला
नदी, नाले, ओढे ओसंडून वाहू लागले ; शेतवडीतही पाणी शिरले
एकमेव गजरगाव बंधाऱ्यावरून वाहतूक सुरू
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसापासून विनाउसंत संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाने तालुक्यातील विविध नदी-नाले, ओढे, धरणे व बंधाऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. हिरण्यकेशी नदीवरील भडगाव पुलावर आज सकाळी पुराचे पाणी आल्याने गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. या नदीवरील ऐनापूर, निलजी, जरळी, नांगनूर हे बंधारे देखील पाण्याखाली गेले आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागाचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळीत बनले आहे.
तालुक्यात गेल्या चार दिवसापासून पावसाचे धुमशान सुरू आहे. सोमवारी दिवसभरात हिरण्यकेशी नदीवरील ऐनापुर व निलजी हे दोन बंधारे पाण्याखाली गेले होते. रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने मंगळवारी सकाळी नऊ वाजता भडगाव पुलावर देखील पाणी आले. त्यामुळे गडहिंग्लज - चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक पूर्णतः थांबली आहे. जरळी व नांगनूर या दोन्ही बंधार्यांवर देखील पाणी आल्याने हे मार्गदेखील वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. गडहिंग्लजला संपर्क साधण्यासाठी केवळ गजरगाव बंधार्यावरील एकमेवमार्ग सुरू आहे. मात्र पाण्याची पातळी वाढल्यास हा मार्ग देखील पाण्याखाली जातो. दरम्यान, हलकर्णी - बसर्गे ओढ्यावर देखील मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक देखील ठप्प झाली होती. या संततधार पावसाने शेतवाडीत देखील पाणी शिरले असून संपूर्ण पिके पाण्यात आहेत. पूरस्थितीमुळे एसटी बस वाहतूक देखील विस्कळीत बनली आहे.
प्रशासनाने घेतली खबरदारी ; पूरस्थितीवर लक्ष ठेवून
पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने देखील योग्य ती खबरदारी घेतली आहे. भडगाव पुलावर पाणी आल्याने हा मार्ग पोलीस प्रशासनाने बॅरिकेट्स लावून वाहतुकीसाठी बंद केला आहे. उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, पोलीस उपाधीक्षक रामदास इंगवले, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर, तहसीलदार ऋषिकेत शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम महसूल अधिकारी सौ. रूपाली कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी दत्तात्रय नाईक, पोलीस कॉन्स्टेबल विजय बंदी, पोलीस पाटील उदय पुजारी, सामाजिक कार्यकर्ते वसंत नाईक हे पूरस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पुलावर पाणी आल्यानंतर वाहन चालकांना त्यांनी पर्याय मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करत सतर्कता बाळगली. आवश्यक असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन त्यांनी केले.