इरलं घेऊन महिला शेतकऱ्यांचा सहभाग ; मुसळधार पावसात देखील आंदोलन यशस्वी
आजरा (हसन तकीलदार) : राज्यातील 12 जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आजऱ्यातील शिवतीर्थावर बळीराजा एकवटला. धो धो पावसात भिजत महिला शेतकरी डोक्यावर इरलं घेऊन सहभागी झाल्या. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी पुष्प अर्पण करून शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील, जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, सह संपर्कप्रमुख विजय देवणे, विद्याधर गुरबे, कॉ. संपत देसाई, उमेश आपटे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. मागील चारपाच दिवसापासून आजऱ्यात धो पावसाने कहर केला आहे. अशा पावसात सुद्धा शेतकऱ्यांनी आणि सर्व विरोधीपक्षीय नेत्यांनी पावसाची तमा न बाळगता मोर्चा यशस्वी केला.
एकच जिद्द -शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, या सरकारचं करायचं काय?.... अशा अनेक घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यावेळी अनेक उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करीत शक्तिपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला.
माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, जेथून शक्तिपीठ जाणार आहे तेथील शेतकऱ्यांनी आपल्या वावरात स्वातंत्र्य दिनी तिरंगा फडकवलाय. कारण या सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की देशप्रेमाचा ठेका फक्त त्यांनीच घेतलाय. खरे देशप्रेमी आणि देशभक्त हा शेतकरी आहे. कारण या शेतकऱ्याने देशाला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा लोकसंख्या केवळ 40 कोटी होती तरीसुद्धा दोनवेळ खायला मिळेल इतकं अन्नधान्य देशात पिकत नव्हतं. परदेशातून अन्नधान्य आयात करावं लागत होते. लालबहादूर शास्त्रीनी आवाहन केल्यानंतर हरित क्रांती घडवून आणली आणि 40 कोटीची 140 कोटी लोकसंख्या झाली तरी आज आपण साखर, तांदूळ, गहू, सोयाबीन, मका, फळे,भाजीपाला निर्यात करतो. एवढा पराक्रम करणारे शेतकरीच खऱ्या अर्थाने देशभक्त आहेत. शक्तिपीठाच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये बॉक्साईड उत्खननाचा डाव आहे. 32 हजार कोटीच्या रस्त्याला एक लाख सहा हजार कोटी रुपये किंमत दाखवून 70 हजार कोटी वाटून घेण्याचा यांचा डाव आहे. मुख्यमंत्र्यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का? अदाणीची गडचिरोलीच्या अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे. हे खनीज गोव्याच्या त्यांच्या बंदरावर नेऊन बाहेर निर्यात करण्यासाठी हा आटापीटा आहे. देशातील उद्योगपतींचे लाड पुरवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे.
आमदार सतेज पाटील म्हणाले, सरकारने डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे आणि सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायचं काम आम्हाला करावं लागणार आहे. याअगोदर कोणत्याही प्रकल्पाना विरोध झालेला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा केवळ ठेकेदार आणि भांडवलदार यांना पोसण्यासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. शेतकऱ्यांच्या आणि शेतजमिनीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागणार आहे. शेतकऱ्यांनी पैशाच्या किंवा कोणत्याच अमिषाला बळी न पडता आपल्या वाडवडलांच्या जमिनी लाटू देऊ नका. हजारो एकर शेतजमीन उद्योजकांच्या घशात घालण्याचा घाट सुरु आहे. गरज नसलेल्या शक्तिपीठाविरोधात सर्वजण एकत्र लढा देऊया आणि गणेशोत्सवानंतर या विरोधात लढा आणखी तीव्र करूया असे आवाहन त्यांनी केले.
प्रा. सुनील शिंत्रे म्हणाले, आमच्या भागात शक्तिपीठाचा संबंध नव्हता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती दिंडी काढण्यासाठी सांगितले तेव्हा खेड्यापाड्यातून फिरलो, त्यावेळी शेतकऱ्यांनी आम्हाला शक्तिपीठ नको आम्हांला कर्जमाफी हवीय अशी भावना व्यक्त केली. ज्या शक्तिपीठासाठी 86 हजार कोटी खर्च करताय त्या खर्चात आमच्या शेतकऱ्यांच्या दोनवेळा कर्जमाफी होऊ शकते. गोव्याला जाण्यासाठी कितीतरी रस्ते आमच्या भागामध्ये आहेत. नागपूरपासून रत्नागिरीकडे जाणारा तोही रस्ता असतेवेळी या शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? या अगोदर जिल्हापरिषदेची रचना झाली त्यावेळी एक कमी करून दोनच जिल्हापरिषद मतदार संघ ठेवले. आणि आता शेतजमिनी काढून घेऊन जर आमच्या तालुक्याचे अस्तित्व नाहीसं करणार असाल तर माझा शेतकरी कधीही सहन करणार नाही. शक्तिपीठविरोधात आम्ही ताकतीने लढा देऊ असा इशारा त्यांनी दिला.
विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनार्थ सरकारने जमा केलेले सातबारा हे कोणत्याही बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. बड्या उद्योगपतींच्या पैशाचा मोह या सरकारला आहे. जिल्ह्याच्या मंत्र्यांनी देखील शक्तीपिठासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी. कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, शक्तिपीठामुळे अनेक गावांचे विभाजन होणार आहे. भागाच्या विकासासाठी रेल्वे मार्गाची आवश्यकता आहे. अमर चव्हाण यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. शेतात वाढलेलं तण पायानं तुडवून संपवायची ताकत शेतकरी माता भगिनींमध्ये आहे. यांना संपवायला वेळ लागणार नाही. एक दोन तास डीजे वाजला तर आमच्या म्हशी दूध देत नाहीत आणि जर या महामार्गावर वाहनांच्या हॉर्न आणि आवाजाने म्हशी दूध देतील काय?असे त्यांनी सांगितले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यानावर, कॉ. संपत देसाई, कॉ. अतुल दिघे, तानाजी देसाई, कॉ. शिवाजी गुरव, राहुल देसाई,आदिनीही आपली मनोगते व्यक्त केली. दरम्यान, आजरा तहसील कार्यालयाला याबाबतचे निवेदन देण्यात आले.
मुकुंददादा देसाई, अंजनाताई रेडेकर, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळराव पाटील, संभाजी पाटील, कॉ. सम्राट मोरे, संभाजी सरदेसाई, रियाजभाई शमनजी, अल्बर्ट डिसोझा, सुभाष देसाई, डॉ. धनाजी राणे, संजयभाऊ सावंत, अभिषेक शिंपी, नौशादभाई बुडडेखान, आरिफभाई खेडेकर, प्रभाकर कोरवी, डॉ. धनाजी राणे, प्रकाश पाटील, रवींद्र भाटले, कॉ. संजय घाटगे, विक्रम देसाई, युवराज पोवार, सचिन घोरपडे, रणजित देसाई, बिलाल लतीफ, निवृत्ती कांबळे, दिनेश कांबळे, बाकीव खेडेकर यांच्यासह महिला, शेतकरी तसेच विविध पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.