गिजवणे ग्रामस्थांचा आरोप ; चौकशी करून कारवाई करण्याची मागणी
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देत 'आत्मक्लेश'आंदोलनाचा दिला इशारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): पोलीस बंदोबस्तात कोरम पूर्ण ग्रामसभा सुरू असताना देखील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व काही सदस्य सभेतून उठून जात ही सभा अर्ध्यावरच गुंडाळण्यात आल्याचा आरोप गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणे गावच्या ग्रामस्थांनी केला आहे. याची सखोल चौकशी करावी अन्यथा आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, गिजवणे ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामस्थांच्या उपस्थितीत सुरू होती. या सभेला पोलीस बंदोबस्तही होता. सभा सुरू झाल्यानंतर विविध मुद्द्यांवर चर्चा देखील सुरू होती. याचे चित्रीकरण देखील सुरू होते. मात्र ग्रामसभेचे अध्यक्ष हे ग्रामपंचायत अधिकारी असणार आहेत असे सांगत सरपंचांसह काही ग्रामपंचायत पदाधिकारी सभा अर्ध्यावर सोडून निघून गेले, हे अयोग्य आहे. कायद्यामध्ये अशी कोणतीही तरतूद नाही. यावेळी सभेला शशिका पोटजाळे, वर्षा पाटील व सुगंधा कुंभार हे तीन ग्रामपंचायत सदस्य शेवटपर्यंत ग्रामसभेत उपस्थित असताना देखील चर्चा घडवून आणणे अपेक्षित होते. मात्र ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी पुढे ही सभा चालू ठेवली नाही. रोजगार व शेतीचे कामे सोडून ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित असताना देखील ही ग्रामसभा अर्ध्यावरच संपवणे अयोग्य असून हा ग्रामस्थांवर अन्याय आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी या निवेदनातून ग्रामस्थांनी केली असून अन्यथा ग्रामपंचायतीसमोर आत्मक्लेश आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदन गणेश कळेकर, जनार्दन तोडकर, सागर शिंदे, मानतेश बन्नी, स्वप्नील कोरी, अभिनंदन पाटील, प्रभात साबळे, प्रकाश कडुकर, नेताजी बरकाळे, किशोर साबळे,अनिल सुतार, संतोष माने, सचिन लोहार, बंडा पाथरवट यांच्या शिष्टमंडळाने दिले. निवेदनावर गणेश कळेकर, सागर शिंदे, विजय कातकर, जनार्दन तोडकर, अनिल सुतार, सचिन लोहार, सुरेश कदम, गौतम गायकवाड, अनिल पोटजाळे, मल्लिकार्जुन पाटील, विनायक पाटील, सुधाकर गोरुले, विश्वजीत पाटील यांच्यासह इतर ग्रामस्थांच्या सह्या आहेत.