व्हळतकर कुटुंबीयांचे सांत्वन करत दिला धीर
गडहिंग्लज (प्रतिनिधी): आजरा तालुक्यातील साळगाव येथील धोंडीबा व्हळतकर या शेतकऱ्याचा गव्याच्या हल्ल्यात 3 मे रोजी मृत्यू झाला. त्या पाठोपाठ त्यांचे चिरंजीव चंद्रकांत व्हळतकर यांचे देखील महिन्याभरात अल्पशा आजाराने निधन झाले. घरातील दोन कर्त्या पुरुषांचे एकापाठोपाठ एक निधन झाल्याने व्हळतकर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. या पार्श्वभूमीवर गडहिंग्लज येथील जय जवान जय किसान फौंडेशन व चितळे (ता.आजरा)चे उपसरपंच उदयसिंह सरदेसाई यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करत दोघांनीही १० हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य करत कुटुंबीयांना धीर दिला.
चंद्रकांत यांचा चिरंजीव तुषार हा १२ वीत शिकत असून मुलगी संस्कृती सातवीत शिकते. यावेळी सचिव रामकृष्ण शेंडे, भरत येळ्ळूरे, धनाजी चव्हाण, बाळु पोवार, उदयसिंह सरदेसाई यांच्यासह अध्यक्ष कुमार पाटील, साळगावचे सरपंच धनंजय पाटील, अमर व्हळतकर, अमोल पाटील, माजी सैनिक विश्वास व्हळतकर, श्रीमती सखुबाई व्हळतकर, श्रीमती कल्पना व्हळतकर उपस्थित होते.
यापूर्वी सेना परिवारासह अनेक गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबांना आजी-माजी सैनिक तालुका वेल्फेअर असोसिएशन संचलित जय जवान जय किसान फौंडेशनच्या वतीने मदत करण्यात आली आहे. सदर रक्कम राधानगरी तालुक्यातील खिंडी व्हरवडे येथील लक्ष्य करिअर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत हंडे यांच्याकडून फौंडेशनला मिळाली होती.