गवसे, आंबोली परिसरातील ढगफुटी सदृश्य पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ
गडहिंग्लज- चंदगड राज्य मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरु
निलजी बंधारा
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कालपासून सुरू झालेला संततधार पाऊस व कोकणातील आंबोली व गवसे भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीवरील गडहिंग्लज तालुक्यातील ऐनापूर व निलजी बंधाऱ्यावर काल रात्री उशिरा पाणी आल्याने या दोन्हीही पुलांवरील वाहतूक बंद झाली आहे. भडगाव पुलाखालील पाण्याच्या पातळीत देखील वाढ होताना दिसत आहे. गडहिंग्लज- चंदगड राज्यमार्गावरील वाहतूक मात्र अद्याप सुरळीत सुरू आहे. जरळी बंधाऱ्यावरील वाहतूक चालू आहे.
गडहिंग्लज तालुक्यात आठवडाभर पावसाला जोर नव्हता. गेल्या दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे. या पावसाने शेतवाडीत पाणी साचले आहे. काल आंबोली परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने तालुक्यातील ऐनापुर व निलजी बंधार्यांवर पाणी आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भडगाव गावच्या जॅकवेलमध्ये पाणी शिरले ; पाणी उकळून, गाळून पिण्याची गरज
छायाचित्र सौजन्य : वसंत नाईक, भडगाव
भडगाव पुलाखालील नदीच्या पाणी पातळीत देखील वाढ झाली असून भडगाव गावच्या जॅकवेलमध्ये पाणी शिरले आहे. पावसाचे गढूळ पाणी जॅकवेलमध्ये गेल्याने दक्षता म्हणून ग्रामस्थांनी पाणी उकळून व गाळून पिणे गरजेचे आहे. या दृष्टीने ग्रामपंचायतीने देखील खबरदारी घेतली आहे. याकडे लक्ष ठेवून आहेत.
छायाचित्र सौजन्य : वसंत नाईक, भडगाव