Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

जि. प., पं. स. निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांच्या मताला प्राधान्य राहील!

निष्ठावान, मेहनती शिवसैनिकांचे खच्चीकरण होणार नाही, त्यांना संधी मिळणारच


आमदार सुनील प्रभू यांचा शिवसैनिकांना शब्द 


गडहिंग्लज येथे ठाकरे शिवसेना कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पदाधिकाऱ्यांचा संवाद मेळावा 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका लढवताना स्थानिक कार्यकर्त्यांची मते व भावना जाणून घेऊनच निर्णय घेतले जातील. निवडणूक इच्छुक निष्ठावान  व मेहनती शिवसैनिकांचे खच्चीकरण होऊ देणार नाही, त्यामुळे शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे निवडणुकांच्या तयारीला लागावे असे आवाहन शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते व आमदार सुनील प्रभू यांनी गडहिंग्लज येथे केले.



गडहिंग्लज येथे शिवसेनेच्या कोल्हापूर जिल्हा ग्रामीण कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर  संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,  उपनेते  व जिल्हाप्रमुख संजय पवार, उपनेत्या जान्हवी सावंत, राज्य संघटक चंगेजभाई पठाण, जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे, जिल्हाप्रमुख संभाजी पाटील, संभाजी भोकरे, तालुका प्रमुख दिलीप माने, अजित खोत, युवा सेना जिल्हाधिकारी अवधूत पाटील, महिला संघटिका शांता जाधव उपस्थित होते.




यावेळी बोलताना आमदार सुनील प्रभू म्हणाले, महाराष्ट्रात प्रत्येक कानाकोपऱ्यातील जनतेच्या मनामनात शिवसेनाप्रमुखांचे विचार कायम आहेत. नेते गेले तरी कार्यकर्ते, मतदार इकडेच आहेत त्यामुळे पक्षाला गतवैभव मिळेल यात शंका नाही. पक्षातून गेलेल्यांवर  बोलण्यापेक्षा त्यांना कामातून उत्तर द्या. जिद्दीवर, मेहनतीवर व आपल्या बळावर कोणत्याही निवडणुका जिंकता येतात हे शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी घराघरात जाऊन बांधणी करावी. येत्या निवडणुकांमध्ये इच्छुक निष्ठावान व मेहनती शिवसैनिकांचे कोणत्याही प्रकारचे खच्चीकरण होणार नाही. निश्चितच त्यांचा विचार केला जाईल. पदाधिकाऱ्यांनी स्थानिक पातळीवरील जनतेच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलने करावीत असा सल्ला देखील दिला.



यावेळी आमदार प्रभू यांनी गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल, राधानगरी तालुक्यातील पक्ष संघटन व सद्यपरिस्थिती याबाबत तालुकाप्रमुख  व उपजिल्हाप्रमुखांकडून माहिती घेतली. यावेळी कागल तालुका प्रमुख जयसिंग टिकले, आजरा तालुकाप्रमुख युवराज पोवार, गडहिंग्लज तालुकाप्रमुख दिलीप माने,  भुदरगड तालुकाप्रमुख अविनाश शिंदे, राधानगरी तालुका प्रमुख बाबासाहेब पाटील, चंदगड विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू रेडेकर, उपजिल्हाप्रमुख सुरेश चौगुले, संभाजी भोकरे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील यांनी आपापल्या मतदारसंघातील पक्षाची ताकद व संघटन याबाबत माहिती दिली. कोल्हापूर जिल्हाप्रमुख प्रा. सुनील शिंत्रे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी स्थानिक आघाड्यांना वरिष्ठांनी परवानगी द्यावी अशी मागणी केली. यावेळी उपनेत्या जान्हवी सावंत, संजय पवार, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी घर तेथे शिवसैनिक, गाव तेथे शाखा यानुसार शिवसैनिकांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आवाहन केले. या मेळाव्याला कोल्हापूर जिल्हा ग्रामीण मधील उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, युवा सेना, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन गडहिंग्लज तालुकाप्रमुख अजित खोत यांनी केले.



गडहिंग्लज, चंदगड, आजऱ्यातील  कार्यकर्त्यांचे शिवसेनेत 'इनकमिंग' 


या मेळाव्यात गडहिंग्लज येथील शिंदे गटाचे सागर कुराडे यांची घरवापसी झाली. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह पुन्हा ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर चंदगड येथील सुज्ञान दुपदाळे, संदीप पाटील, दत्ता पाटील, आजरा येथील सरिता कुराडे, खमलेहट्टी येथील महादेव माने यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. त्यांचे स्वागत आमदार सुनील प्रभू यांच्या हस्ते करण्यात आले.


संवाद बैठकीला मेळाव्याचे स्वरूप, आमदार प्रभूंकडून शिवसैनिकांचे कौतुक 



आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची संवाद बैठक असे ठरले होते. मात्र या बैठकीला शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे लावलेली मोठ्या संख्येची  हजेरी पाहता या बैठकीला मेळाव्याचे स्वरूप आले. शिवसैनिकांचा उत्साह व जोश पाहून आमदार सुनील प्रभू यांनी पदाधिकाऱ्यांसह सर्व शिवसैनिकांचे कौतुक केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.