Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील जागतिक दर्जाचे प्रस्तावित स्मारक वेगाने पूर्ण करा !

भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 




गडहिंग्लज (प्रतिनिधी): अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील राजभवनाजवळील अरबी समुद्रातील जागतिक दर्जाचे प्रस्तावित स्मारक वेगाने पूर्णत्वास नेण्यात यावे, अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.




निवेदनात म्हटले आहे की, मुंबईतील गिरगाव चौपाटी पासून 3.60 किमी व नरिमन पॉईंट पासून 2.60 किमी आत राजभवनाजवळून 1.20 किमी अरबी समुद्रात 16.86 हेक्टर क्षेत्रफळाच्या खडकावर, ज्यानी देशात पहिल्यांदाच स्वत:चे पहिले आरमार उभारले त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे 3600 कोटी रुपये अंदाजित खर्चाचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारण्याचे प्रस्तावित आहे. हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगडाच्या प्रवेशद्वाराची प्रतीकृती, भवानी मातेचे मंदिर, ऐतिहासिक संग्रहालय व छत्रपतींच्या महापराक्रमाची साक्ष उलगडून दाखवणारे थिएटर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा यांचा यात समावेश आहे.




24 डिसेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिवस्मारकाचा भूमी पूजन सोहळा पार पडला आहे. लार्सन आणि टूब्रो कंपनीला वर्क ऑर्डर पण दिली आहे. जून 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण न्यायालयीन प्रक्रियेत हे काम रखडलेले आहे. मुंबई महानगरपालिका, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट, सीआरझेड इत्यादी 9 विभागांकडून मंजुरी घेऊन त्याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला द्यावयाची आहे. सध्या देशात आणि राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने आणि प्रेरणेने चालणारे सरकार आहे.


तेंव्हा प्रकल्पाच्या कामकाजाच्या अनुषंगाने उच्चस्तरीय सुकाणू समिती, प्रकल्प संनियंत्रण व अंमलबजावणी समिती आणि कार्यकारी समिती यांचे पुनर्गठन करुन त्यांची कार्यकक्षा ठरवावी व न्यायालयीन स्थगिती ताबडतोब उठवून अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे मुंबईतील राजभवनाजवळील अरबी समुद्रातील जागतिक दर्जाचे प्रस्तावित स्मारक वेगाने पूर्णत्वास न्यावे अशी मागणी श्री. सावंत यांनी या निवेदनातून केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.