Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर

जिल्ह्यातील सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) व सह दुय्यम निबंधक कार्यालयांचा पालकमंत्र्यांकडून आढावा




कोल्हापूर : जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या कामकाजाचा आढावा घेताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी  सांगितले की, जिल्ह्यात एकही दस्त अन्यायकारक ठरणार नाही याची काळजी घ्या. कोणत्याही प्रकारचे नियमबाह्य काम होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 


जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, तसेच सह जिल्हा निबंधक (मुद्रांक) अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्यासह सर्व तालुका सह दुय्यम निबंधक उपस्थित होते.


पालकमंत्री आबिटकर यांनी मुद्रांक नोंदणी कार्यालयांना जनतेच्या हितासाठी काम करण्याचे आवाहन केले. दस्त नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता राखून लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले.


ते म्हणाले, ‘नोंदणी प्रक्रियेत होणाऱ्या गैरव्यवहारांवर तातडीने अंकुश आणला जावा. दस्त नोंदणी ही प्रक्रिया सरळसोप्या पद्धतीने पार पडावी यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा कर्मचाऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही. जिल्ह्यातील कोणत्याही व्यक्तीवर अन्याय होणार नाही, याची खात्री करणे हे आपले कर्तव्य आहे. नियमांनुसार काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले जाईल, तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल असे त्यांनी ठामपणे सांगितले.


या बैठकीत लोकाभिमुख सेवा सुधारण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा झाली. मुद्रांक व दस्त नोंदणी प्रक्रिया अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी डिजिटल पद्धतींचा अधिकाधिक उपयोग करण्यात येणार आहे.


जिल्ह्यातील मुद्रांक व नोंदणी कार्यालयांच्या चांगल्या कामकाजातून जिल्ह्यातील नागरीकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत आणि ही त्यांची जबाबदारी आहे. नियमांचे काटेकोर पालन, पारदर्शकता, व कार्यक्षम व्यवस्थापनाच्या माध्यमातून या क्षेत्रातील फसवणूक थांबवण्यासाठी त्यांनी कटिबद्ध असले पाहिजे असे ते पुढे म्हणाले. बैठकीवेळी मान्यवरांचे स्वागत बाबासाहेब वाघमोडे यांनी पुस्तिका भेट देऊन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.