गडहिंग्लज युनायटेड मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबिराचा समारोप
गडहिंग्लज (प्रतिनिधी): नवोदितात खेळाची वाढणारी जागरूकता स्वागतार्ह आहे. खासकरून पालकांचा खेळासाठी आग्रह आशादायक आहे. कोणत्याही खेळासाठी सरावाबरोबरच सकस आहार आणि पुरेशी विश्रांती देखील चांगली कामगिरी करण्यासाठी महत्वाची असल्याचे मत संत गजानन महाराज आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंगल मोरबाळे यांनी व्यक्त केले.
गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि श्री रावसाहेबआण्णा कित्तुरकर विश्वस्त मंडळाच्या मोफत फुटबॉल प्रशिक्षण शिबाराच्या समारोप प्रसंगी त्या बोलत होत्या. ज्येष्ठ खेळाडू महादेव पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. युनायटेडचे सचिव दिपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण शिबिराचा आढावा घेतला. यावेळी उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून राजवीर पाटील, अंशुमन गायकवाड, सुमीत साळोखे, सायली खोत यांचा क्रीडा साहित्य देऊन गौरव झाला. आंतरजिल्हा फुटबॉल स्पर्धेत उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या यासीन नदाफ, शिबिर समन्वयक ओमकार घुगरी यांचाही सत्कार झाला.
डॉ. मोरबाळे म्हणाल्या, नव्या पिढीला तंत्रज्ञानाचे वरदान असले तरी त्याचा फटका बसणार नाही याची दक्षता घ्यावी. मैदानी खेळच अधिक तंदुरुस्त ठेवू शकतात. त्यामुळे चांगले मार्क काढण्याबरोबरच आपल्या पाल्याची मैदानी खेळातून तंदुरुस्ती राखण्यासाठी पालकांनी लक्ष द्यावे.’’ यावेळी डी लिट पदवी मिळाल्याबद्दल साताप्पा कांबळे, राष्ट्रीय पुरस्कारसाठी डॉ मोरबाळे, विनायक पाटील यांचा सत्कार तर सेवानिवृत्तीसाठी आप्पासाहेब पाटील यांना शुभेच्छा देण्यात आल्या. युनायटेडचे संचालक मल्लिकार्जून बेल्लद, डॉ राकेश बेळगुद्री यांच्यासह खेळाडू, पालक उपस्थित होते. संभाजी शिवारे यांनी आभार मानले.
खेळातून जीवन कौशल्ये
प्रत्येक खेळ अनेक जीवन कौशल्ये शिकवतो. सांघिक भावना, संघर्षवृत्ती, शिस्तबध्दपणा, पंच आणि प्रतिस्पर्ध्यांचा आदर ही जीवन कौशल्ये खेळातूनच प्रभावीपणे शिकता येतात. त्यासाठी प्रत्येकाने एखादा तरी मैदानी खेळ आयुष्यभर खेळावा असे आवाहन आप्पासाहेब पाटील यांनी भाषणात केले.