भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
सुधारित शहर विकास आराखडा तातडीने प्रसिद्ध करण्याची मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर शहर महानगरपालिकेची, बरीच वर्षे रखडलेली प्रलंबित हद्दवाढ ताबडतोब मंजूर करून सुधारित शहर विकास आराखडा तातडीने प्रसिद्ध करावा अशी मागणी भाजपा अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या निवेदनातून केली आहे.
कोल्हापूर नगरपालिकेचे 1972 साली "ड" वर्ग महानगरपालिकेत रुपांतर झाले. त्यानंतर एक इंचही हद्दवाढ झाली नाही. हद्दवाढीला पर्याय म्हणून 2017 साली 42 गावांसाठी तत्कालीन महसूल मंत्री व विद्यमान उच्च-तंत्रशिक्षण व संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकाराने आणि सुनियोजित प्रयत्नाने "नियोजन आणि विकास प्राधिकरणाची " (PLANNING AND DEVELOPMENT AUTHORITY)स्थापना झाली. पण त्यानंतर प्राधिकरणाचा नागरिकांना येणारा अनुभव फारसा चांगला नाही. पुणे महापालिकेची हद्दवाढ तब्बल 27 वेळा झाली. हद्दवाढीनंतर महापालिकेत आलेल्या तेथील गावांचाही विकास झाला. नाशिक व संभाजीनगर महापालिकांचीही टप्प्याटप्प्याने हद्दवाढ झाली. पण कोल्हापूर महानगरपालिकेच्या हदृदवाढीचा प्रश्न अनेक वर्षे रखडला. त्यामुळे महापालिकेचे मर्यादित उत्पन्न, शासनाकडून निधी मिळण्यास होणारा विलंब यामुळे शहराचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत.
कचरा उठाव, सांडपाणी निर्गतीकरण, सार्वजनिक आरोग्य,स्वच्छ व पुरेसा पाणीपुरवठा बांधकाम व विकास परवाने या पातळीवर शहरवासीयांच्या गंभीर तक्रारी आहेत. प्रस्तावित हद्दवाढीतील गावांच्या विकासालाही खिळ बसलेली आहे. हद्दवाढ करताना शहरात येऊ पहाणाऱ्या गावांना मिळणाऱ्या नागरी सुविधांबरोबरच त्यांच्या मनात असलेली महानगरपालिकेच्या कराबाबतची भिती दूर करुन आणि हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावांच्या समन्वयाने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी,कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या कोल्हापूर शहर महानगरपालिकेची हद्दवाढ ताबडतोब करून सुधारित शहर विकास आराखडा तातडीने प्रसिद्ध करावा अशी मागणी या निवेदनातून केली आहे.