Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कोल्हापूर येथे प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत मोफत प्रशिक्षणाला भरघोस प्रतिसाद



कोल्हापूर :  जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, कोल्हापूर व वनस्पती शास्त्र अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत स्वयंसहाय्यता गटातील बीज भांडवल प्राप्त ३० लाभार्थ्यांचे एकदिवसीय प्रशिक्षण शिवाजी विद्यापीठात पार पडले. या प्रशिक्षणाला भरघोस प्रतिसाद मिळाला.



क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकांतर्गत जिल्ह्यामध्ये ७५३ महिला लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत मोफत प्रशिक्षण देण्यात येणार असून विद्यापीठात झालेल्या या प्रशिक्षणामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत अन्न प्रक्रियेचे मूलभूत प्रकार, अन्न सुरक्षा मानके, पॅकेजिंग तंत्रज्ञान, ब्रँडिंग, विक्री आणि वितरण याबाबत माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणातून अन्न प्रक्रियेबाबत उपयुक्त माहिती मिळाली असून याचा चांगला उपयोग उत्पादन तयार करताना होईल, अशा भावना बीज भांडवल प्राप्त लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या. या प्रसंगी वनस्पती शास्त्र अधिविभाग समन्वयक आर.एस.निंबाळकर, योजनेच्या क्षेत्रीय अधिकारी तनुजा परुळेकर, दिपक कांबळे, शंभुराजे वारके यांनी मार्गदर्शन केले.




केंद्र शासन सहाय्यित प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना सन २०२०-२१ ते २०२५-२६ या कालावधीमध्ये राबविली जात आहे. या योजनेचा हेतू शेतमालावर प्रक्रिया करणारे सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग, सध्या कार्यरत असलेल्या उद्योगांना औपचारिक रचनेमध्ये आणणे व त्यांचा विस्तार करणे, उत्पादनांचे ब्रँडिंग व विपणन बळकट करुन संघटीत पुरवठा मुल्य साखळीशी जोडणे, नवीन सूक्ष्म उद्योग वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. योजनेत वैयक्तिक घटकामध्ये प्रकल्प किमतीच्या ३५ टक्के अर्थसहाय्य दिले जाते.




प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत क्षमता बांधणी व प्रशिक्षण घटकामध्ये केंद्र शासनाचे १०० टक्के अर्थसहाय्य आहे. प्रशिक्षणाचा उद्देश नवीन आणि कार्यरत सुक्ष्म अन्न प्रक्रिया यांची उद्योजकीय क्षमता बळकट करणे, अन्न प्रक्रिया उद्योगातील अन्न उत्पादने हाताळणे, अन्न सुरक्षा, स्वच्छता या विषयाबाबत प्रशिक्षण देणे, अन्न प्रक्रिया उद्योगातील व्यवसाय संधी ओळखणे, व्यावसायिक आराखडा तयार करणे, उद्यम (उद्योग आधार) व FSSAI प्रमाणपत्र प्राप्त करणे तसेच जीएसटी परवान्यांबाबत माहिती देणे तसेच उत्पादन विकास साठवणूक, मूल्यवर्धन, उत्पादन प्रक्रिया तंत्रज्ञान, मशिनरी, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंग, अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता मानके या बाबत अवगत करणे हा आहे.



योजनेविषयी अधिक माहितीसाठी संपर्क- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, क्षेत्रीय अधिकारी, जिल्हा संसाधन व्यक्ती, किंवा संपर्क क्रमांक - ०२३१२६५४६०३ यावर तसेच कृषी विभागाच्या अन्य योजनांच्या माहिती साठी agrikolhapur.blogspot.com या ब्लॉगस्पॉटला भेट द्यावी.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.