आजरा (हसन तकीलदार ) : आजरा तालुक्यातील वसंतराव देसाई साखर कारखान्याला सर्व प्रथम आर्थिक आरिष्ठातून बाहेर काढणे गरजेचे आहे. कारखान्यावर वाढलेले कर्ज आणि शासकीय देणी यांचे योग्य नियोजन करून त्यामध्ये सवलती मिळवणे गरजेचे आहे. सहकार क्षेत्रातील आपल्या दीर्घ व कुशल अनुभव घेऊन कारखान्याचे अध्यक्ष मुकुंददादा देसाई आपल्या अधिकाऱ्यांसमवेत राज्याचे सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील आणि साखर आयुक्त सिद्राम सलीमठ यांची पुणे येथे नुकताच भेट घेतली आणि आपले निवेदन दिले.
आजरा कारखाना कर्जाच्या अडचणीत अडकलेला आहे. योग्य व काटकसरीने कारखान्याचे नियोजन करून शासकीय यंत्रणेकडून जास्तीत जास्त सवलत मिळवणे कारखान्यासाठी आज काळाची गरज आहे. यासाठी सहकार क्षेत्रात अनुभवी असलेले कारखान्याचे चेअरमन मुकुंददादा देसाई यांनी या भेटीत कारखाना उभारणी काळात शासनाकडून प्राप्त झालेल्या 3 कोटी कर्जावरील देय व्याजाची रक्कम आज अंदाजे 12 कोटी 12 लाख पर्यंत पोहचलेली आहे. कारखान्याची आर्थिक अडचण असलेने ही रक्कम भरणे कारखान्याला शक्य नाही त्यामुळे सदर रक्कम माफ करणेत यावी त्याचबरोबर शासकीय भागभांडवलामधील परतफेड करावयाची 6 कोटी 9 लाख रुपये रक्कम पाच वर्षाच्या विलंब कालावधीनंतर पुढे समान 15 हफ्त्यात भरणेसाठी सवलत मिळून याचे हफ्ते पाडून मिळावेत अशा आशयाचे निवेदन देऊन सहकार मंत्री तसेच साखर आयुक्तालय यांना विनंती करण्यात आली आहे. या दोन्ही बाबीवर सहकार मंत्री नाम.बाबासाहेब पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असलेबाबत सांगण्यात येत आहे.
यावेळी कोल्हापूर जिल्हा बँक प्रतिनिधी सुधीरभाऊ देसाई, संचालक उदयराज पवार, अनिल फडके, रणजित देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती उपस्थित होते.