भाजपा अभियंता आघाडीचे अध्यक्ष चंद्रकांत सावंत यांची केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी
कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाचे बोईंग 737, एअरबस 320 अशा मोठ्या विमानांच्या लॅंडिंगसाठी ,एव्हिएशन फ्युएल फिलिंग स्टेशन, नाईट लॅंडिग, ओव्हरनाईट पार्किंग, 3000 मिटर धावपट्टी सुविधेसह अत्याधुनिकीकरण करण्यात यावे अशी मागणी भाजप अभियंता आघाडीचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत सावंत यांनी केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे ई-मेल द्वारे पाठवलेल्या पत्रातून केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, कोल्हापूर शहर हे सातारा, सांगली, कोल्हापूर , सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांचे मध्यवर्ती औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि व्यापारी केंद्र आहे. येथे भारतातील दक्षिण काशी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी एक अत्यंत पवित्र असे आई अंबाबाईचे प्राचीन मंदिर आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वास्तव्याने आणि पवित्र पदस्पर्शाने पावन झालेले पन्हाळगड, विशाळगड आणि सामानगड असे किल्ले आहेत. कोल्हापुर व कागलला पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. हा कृषीप्रधान साखरपट्टा असून तेथील पर्यटकांचे, उद्योगपतींचे व प्रवाशांचे दररोज मुंबई, बेंगलोर, दिल्ली, अहमदाबाद, भोपाळ , तिरुपती येथे आणि साॅफ्टवेअर अभियंत्यांचे आस्ट्रेलिया, अमेरिकेतील सिलिकाॅन व्हॅली येथे तसेच भारत सरकारच्या आर्थिक दृष्ट्या माफक"उडाण" योजनेमुळे सामान्य प्रवाशांचे सुध्दा मोठ्या प्रमाणावर जाणे येणे सुरू असते.
पण अत्याधुनिक सोयीसुविधेअभावी कोल्हापूर विमानतळावर खुपच गैरसोय होत आहे. तेंव्हा देशातील मेट्रो व मेगा सिटी कनेक्टिव्हिटी करिता इंडिगो, स्टार एअरलाईन्स , इंडियन एअर लाईन्स सारख्या मोठ्या विमान कंपन्यांच्या एक्झिक्युटिव्ह सेवेसह, बोईंग 737, एअरबस 320 सारखी मोठी विमाने लॅंडिगसाठी, एव्हिएशन फ्युएल फिलिंग स्टेशन, नाईट लॅंडिग, ओव्हर नाईट पार्किंग, 3000 मीटर धावपट्टी सुविधेसह अत्याधुनिकीकरण करावे अशी मागणी श्री. सावंत यांनी या पत्रातून केली आहे.