दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून व शासनाच्या सहकार्याने पाणंद रस्ता खुला
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लज तालुक्यातील मासेवाडी या गावातील झाडाझुडपांच्या विळख्यात अडकलेला पाणंद रस्ता तब्बल ७५ वर्षानंतर दानशूर व्यक्तींच्या लोकवर्गणीतून तसेच ग्रामपंचायत व महसूल विभागाच्या सहकार्याने खुला करण्यात आला. त्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या गावातील मासेवाडी- मुंगुरवाडी रस्त्यापासून मोहिते यांच्या शेतापर्यंत अंदाजे एक किलोमीटर लांब व २० फूट रूंद पाणंद रस्ता झाडाझुडपांच्या विळख्यात अडकला होता. त्यामुळे या पाणंद रस्त्याचे रूपांतर पायवाटेत झाल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाले होती. याचा विचार करून गावातील दानशूर व्यक्तींनी लोकवर्गणी काढत या पाणंद रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्णय घेतला व कामाला सुरुवातही केली.
सदर पाणंद रस्त्याच्या कामाचा प्रारंभ निवडणूक नायब तहसीलदार अब्दुलरौप शेख यांच्या हस्ते करण्यात आला. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या आदेशाचे पालन करत गडहिंग्लजचे प्रांताधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार ऋषिकेत शेळके, मंडल अधिकारी आर. के. तोळे, महसूल अधिकारी धनश्री पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच रोहिणी रेडेकर, उपसरपंच दशरथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य दशरथ कुपेकर, पोलीस पाटील बबन कुपेकर, धनंजय कापसे, जोतिबा टक्केकर, संदीप कापसे, रामदास टक्केकर, कोतवाल दत्ता कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पाणंद रस्ता खुला करण्यात आला.



