महामार्गावरील साळगाव फाट्याजवळ समोरून वाहनाची धडक
आजरा (प्रतिनिधी): आजरा -गडहिंग्लज महामार्गावरील साळगाव फाट्यासमोर दुचाकी व चारचाकी यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये रजाक बापू शेख (वय वर्षे 50, रा. साळगाव ता. आजरा) यांचा मृत्यू झाला.
अधिक माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास साळगाव वरून आजऱ्याला येणारे दुचाकीस्वार रजाक शेख व गडहिंग्लजच्या देशेने जाणारी चारचाकी साळगाव फाट्यासमोर दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होऊन जखमी झालेल्या रजाक शेख यांना प्रथम आजरा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने गडहिंग्लजला नेण्याचा सल्ला देण्यात आला परंतु तेथून पुढे बेळगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
वन विभागात वन सेवक या पदावर ते कार्यरत होते. अत्यंत मनमिळाऊ आणि परोपकारी स्वभावामुळे लोकांच्या ते चांगल्या परिचयाचे होते. गरीब, होतकरू गरजूना ते सढळ हाताने ते नेहमी मदत करीत. त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. आजरा पंचक्रोशीत अपघाती मृत्यूची बातमी समजताच हळहळ व्यक्त केली जात होती. मित्रपरिवारात त्यांच्या चांगुलपणाची चर्चा सुरु होती. अपघाताची माहिती मिळताच वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने धाव घेतली. अपघाताची वर्दी वासिम शेख यांनी आजरा पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा असा परिवार आहे.
अपघात ठिकाणचा तिट्टा धोकादायक, उपायोजनेची गरज
पाचच दिवसापूर्वी याच ठिकाणी अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या धोकादायक तिट्ट्याचा विचार करून येथील परिस्थितीची पाहणी करून त्यावर उपाययोजना आखाव्यात अशी मागणी नागरिकांतून होताना दिसत आहे. रजाक बापू शेख यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूमुळे दोस्तीच्या दुनियेतील एक राजा माणूस हरपल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली.

