चंदगड : चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी या गावच्या संदेश गुरव या तरुणाने आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक युवकांना रोजगार मिळवून देण्याचे मोठे कार्य केले आहे. ते 'अनन्या मॅनपॉवर' कंपनीचे रिक्रूटमेंट एक्झिक्युटिव्ह म्हणून गोव्यात कार्यरत आहेत. 52 बेरोजगार युवकांच्या हाताला त्यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा इतरांना संधी देण्याचे उद्दिष्ट ठेवून त्यांनी अनेक तरुणांना योग्य कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत. त्यांच्या या प्रयत्नांमुळे अनेक बेरोजगार तरुणांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली आहे.
नुकतेच चंदगड येथील र. भा. माडखोलकर विद्यालयात रोजगार मेळावा पार पडला. या मेळाव्यात मॅन पॉवर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या संदेश गुरव यांच्या सहकार्याने गोवा येथे ५२ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्राचार्य डॉ. एस डी गोरल यांच्या अध्यक्षतेखाली हा रोजगार मेळावा पार पडला. रोजगार मेळाव्याला आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील शेकडो विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी कंपनीचे मॅनेजर चंदन नाईक यांनी रोजगार विषयी मार्गदर्शन तर रिक्रुटमेंट मॅनेजर संदेश गुरव यांनी करिअर मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. राजाराम साळुंखे यांनी केले. आभार डॉ. टी. ए. कांबळे यांनी मानले.
संदेश गुरव यांच्या या प्रेरणादायी कार्यामुळे चंदगडमधील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील जवळपास 700 युवकांना संदेश गुरव यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झाला आहे. अशा सकारात्मक बदलांमुळे समाजात नवे रोजगारनिर्माते तयार होत आहेत."नोकरी करणारे नाही, नोकरी देणारे बना" असा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दाखवला आहे. संदेश गुरव यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


.jpg)


