आगीत सुका चारा व शेतीची अवजारे देखील खाक
शेतकऱ्याचे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तालुक्यातील हरळी खुर्द येथे आज (रविवार) पहाटे चार वाजता कै. विठू पताडे यांच्या नावे असलेल्या घरठाणातील गोठ्याला लागलेल्या आगीत तानाजी गोविंद पताडे यांनी बांधलेल्या तीन जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला. त्यामुळे श्री. पताडे यांचे अंदाजे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर गोठ्यात तानाजी पताडे यांनी आपली तीन जनावरे बांधली होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत गोठ्यात बांधलेली एक गाभण म्हैस, एक दुभती म्हैस व एक रेडकू अशा तीन जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत सिमेंटचे पत्रे, घराचे लाकडी साहित्य व जनावरांसाठी ठेवलेला सुखा चारा, शेती कामाची अवजारे जळून खाक झाली आहेत. यामुळे अंदाजे २ लाख ७० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
या घटनेचा पंचनामा ग्राम महसुल अधिकारी धनश्री पोवार पोलीस पाटील चंद्रकांत कुंभार महसूल सेवक निवृत्ती गुरव, गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीनिवास वट्टमवार, डॉ. गणेश कुटाळ, गोकुळ ए.आय.टी चे डॉ. प्रमोद पाटील गोकुळचे सहाय्यक व्यवस्थापक डॉक्टर अविनाश जोशी, ग्रामपंचायतीचे पंच दत्तात्रय ऐवाळे भैरवनाथ दूध संस्थेचे चेअरमन बाळासाहेब माने यांनी केला.


