महागावचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी आपल्या मानधनातून अर्धा किलोमीटरचा रस्ता करत घालून दिला नवा आदर्श
गडहिंग्लज (प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील सरपंच प्रशांत शिंदे यांनी आपल्या मानधनातून शेतवाडीतील अर्धा किलोमीटर रस्ता करत या रस्त्याअभावी अनेकांची होणारी गैरसोय दूर केली आहे. त्यांच्या या प्रयत्नाने संत गजानन महाराज हॉस्पिटलपासून ते घाळी रस्ता यांना जोडणारा वहिवाटीचा १५ फूट रुंद व अर्धा किलोमीटर लांबीचा रस्ता खुला झाला आहे. सरपंच प्रशांत शिंदे यांचे हे विधायक काम सर्वांना आदर्श घेण्यासारखे आहे.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिलेल्या आदेशानुसार अनेक गावातील पानंद रस्ते खुले होत आहेत. मात्र महागावातील संत गजानन महाराज हॉस्पिटल ते घाळी रस्त्याला जोडणारा गावाच्या सीमेवरील रस्त्याची शासन दरबारी नोंद नाही. त्यामुळे महागावचे सरपंच प्रशांत शिंदे यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेत आपल्या मानधनातून हा रस्ता तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याला परिसरातील शेतकऱ्यांनी देखील सहमती दर्शवत प्रतिसाद दिल्याने सदरचा रस्ता पूर्णत्वास गेला. रस्त्याअभावी गावातील मयत झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नदी काठावरील घाटाकडे न्यावे लागत असे. वाटेत पाटील आज्जाचे मंदिर असल्याने प्रेत एकतर कुंभार गल्ली, शाहू गल्ली मार्गे किंवा पताडे गल्ली मार्गे न्यावे लागत होते. माळकरी व्यक्तीने किंवा यल्लमाच्या भक्त असणाऱ्या महिलांना प्रेत पाहिल्यानंतर नवीन पाणी आल्याशिवाय स्वयंपाक करता येत नव्हते. तसेच या भागातील शेतकऱ्यांना ऊस वाहतूक करण्यासाठी, एखाद्या रुग्णाला रुग्णवाहिकेतून ने - आण करण्यासाठी मोठी गैरसोय होत होती. मात्र आता सरपंच श्री शिंदे यांच्या पुढाकाराने हा रस्ता पूर्ण झाल्याने या सर्व समस्या मार्गी लागणार आहेत.
यावेळी मंडल अधिकारी आर.के.तोळे, ग्राम महसूल अधिकारी जयश्री चव्हाण, उपसरपंच संदिप कोकितकर, ग्रामपंचायत अधिकारी शशिकांत कुंभार, ग्रा.पं.सदस्य डॉ.विलास रेडेकर, परशराम हुले,अर्जुन रेडेकर, ॲड.राजेंद्र कोले, पोलीस पाटील प्रदिप कांबळे, विजय पन्हाळकर, रमन मुगळे, डॉ.रमेश रेडेकर, सखाराम राणे,रावसाहेब राणे, विरपाक्ष खानापुरे, मारुती हुंदळेकर,शिवराम रेडेकर,संभाजी कुपटे, सुरेश हुंदळेकर, नागोजी पताडे, बाळू रेडेकर,दत्ता पाटील, दयानंद रेडेकर, बाळू पोटे,शशिकांत पाटील,,तानाजी पाटील,पांडुरंग पाटील,दीपक सोमशेट्टी,किरण रेडेकर,नकुशी हुंदळेकर,लिलाबाई जाधव,गणा हुंधळेकर, शुभाण्णा शिंदे,बाळू शिंदे यांच्यासह ग्रामपंचायत, महसूल विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.



