शेतकऱ्यांची कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे निवेदनातून मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): हलकर्णी व चंदनकुड हद्दीतील सर्व खडी क्रशरवर येत्या सात दिवसात कारवाई न केल्यास कार्यालयासमोर घरातील सर्व जनावरांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा येथील शेतकऱ्यांनी कोल्हापूर येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला निवेदनातून दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हलकर्णी व चंदनकुड हद्दीतील सर्व खडी क्रशर बेकायदेशीर रित्या सुरू आहेत. याबाबत दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र या अनुषंगाने कोणती कारवाई केली गेली याची माहिती शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्यामुळे सदर कारवाईचा, पाहणीचा अहवाल येत्या सात दिवसात द्यावा व सर्व खडी क्रशरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर जनावरांसह बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
निवेदनावर राजगोंडा पाटील, राजकुमार पाटील, उत्तम खानापुरे, शेखर देसाई, रामू शेरवी, राजू चाळूगोळ, रायाप्पा धनगर, सिद्धाप्पा धनगर, सचिन शेरवी, महावीर शेरवी, सुनील लब्यागोळ, संतोष लब्यागोळ, बिराप्पा धनगर, शितल मुन्नोळी आदींच्या सह्या आहेत.

