गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात विद्यार्थिनी व्यक्तिमत्व विकास, महिला सबलीकरण मंडळ व समान संधी समिती आणि आत्मभान, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘रिलेशानी’ या विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. या कार्यशाळेचे उदघाटन संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते कुंडीतील रोपाला पाणी घालून करण्यात आले.
या कार्यशाळेमध्ये डॉ.मोहन दास, मीनल, प्रकाश मानव, सचिन सर यांनी मार्गदर्शन केले. आरोग्यभान रिलेशनी, पुणे यांच्यावतीने तरुण मुला-मुलांशी संवाद साधताना डॉ.मोहन दास यांनी विद्यार्थ्यांना शानदार, सुरक्षित, समूह जीवन कसे जगता येईल याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. चांगले जीवन जगायचे असेल त्यादृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याला आरोग्य शिक्षण नको तर आरोग्य संवाद हवा. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यभान असलेच पाहिजे असे स्पष्ट केले. कार्यशाळेचे मार्गदर्शक मिलन यांनी विद्यार्थ्यांना मैत्री म्हणजे काय, मैत्री आणि प्रेम याच्यातील फरक कस ओळखायचा, लैंगिक समानता, सौंदर्य, निसर्ग आणि सोशल मिडिया याविषयी मार्गदर्शन केले.
सचिन सर यांनी विद्यार्थ्यांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल या बद्दल मार्गदर्शन करून या बाबत विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांशी मुक्त संवाद करावा असे स्पष्ट केले. बदल हे नैसर्गिक असतात. ते मानसिकदृष्ट्या स्वीकारण्यात तयार असले पाहिजे असे त्यांनी सांगितले. आजच्या युगात आरोग्य, पर्यावरण आणि शिस्त हे अत्यंत महत्वाचे आहे. या कार्यशाळेच्या समारोपामध्ये श्रावणी पाटील, ओम टिपुगडे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेस ५० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. डॉ.अशोक मोरमारे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.पौर्णिमा पाटील यांनी आभार मानले. या कार्यशाळेचे नियोजन, डॉ.ए.जी.हारदारे, डॉ.विद्या देशमुख,डॉ.वृषाली हेरेकर, प्रा.विक्रम शिंदे यांनी केले.