छायाचित्र : मज्जिद किल्लेदार
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ. सुधीर मुंज यांचा सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून दलित महासंघाचे संस्थापक डॉ. मच्छिंद्र सकटे, शिक्षक व्ही. एस. कुलकर्णी, कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुनिल मोदी, आजरा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मलिककुमार बुरुड यांची उपस्थिती लाभली. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. जी. जी. गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमात डॉ. सुधीर मुंज यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सपत्नीक सत्कार अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमात डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी आपल्या शुभेच्छा भाषणात डॉ. मुंज यांनी सर्वांशी मैत्री जपली आहे. संघटन कौशल्य जपण्याचे त्यांचे कार्य आजही अधोरेखित करणारे आहे. त्यांनी अडचणीच्या काळात मित्रांना मदत करीत खंबीर पाठिंबा दिलेला आहे. आयुष्याच्या प्रवासात त्यांनी केलेले कार्य हे नक्कीच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूर महानगरपालिका स्थायी समितीचे माजी सभापती सुनिल मोदी यांनी डॉ. मुंज हे विद्यार्थी परिषदेचे संघटक होते. गोरगरीब बहुजनांची मुले शिकली पाहिजेत ही त्यांची धारणा होती, त्यांनी केलेल्या कार्यात एक प्रकारची तळमळ ही सर्वांना प्रेरणा देणारी आहे असे त्यांनी स्पष्ट केले. गुरुवर्य व्ही. एस. कुलकर्णी यांनी मुंज हे ध्येयनिष्ठ होते, त्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध केले आहे. शिक्षक म्हणून आपल्याला अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षीय भाषणातून प्रा. किसनराव कुराडे यांनी मुंज यांच्या कार्यकर्तृवाचा खरा अभिमान वाटतो. त्यांनी आपल्या कार्यातून निवृत्त न होता सामाजाच्या कार्यात सतत वाहून घ्यावे असे स्पष्ट करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी डॉ. सुधीर मुंज यांनी आपल्या आजपर्यंतच्या प्रवासात आपल्या कर्तबगार मित्रांनी दिलेली साथ यातून मी खऱ्याअर्थी घडलो असल्याचे सांगून त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सौ. वैशाली मुंज यांनीही मनोगतातून डॉ. मुंज यांनी कुटुंबाला दिलेली साथ मोलाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
यावेळी आजरा सहकारी साखर कारखान्याचे मलिककुमार बुरुड, शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे, प्रा. साहेबराव काटकर, प्राचार्य डॉ. एस. एम. कदम, प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, प्रा. एम. के. नोरेंज आदींनी आपल्या भाषणातून डॉ. मुंज यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष के.जी.पाटील, जे. वाय. बारदेस्कर, संस्थेचे एम. के. सुतार, नंदनवाडे गुरुजी, के. बी. पेडणेकर, राजू पोवार यांच्यासह इतर मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, ग्रंथपाल संदीप कुराडे, रजिस्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एन.बी. एकिले, डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. आभार संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांनी मानले.