गडहिंग्लज विभाग शेतकरी मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीची मागणी
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कोल्हापूर पाटबंधारेचा दक्षिण विभाग कार्यालय गडहिंग्लज येथे स्थलांतरित करण्यात यावा अशी मागणी गडहिंग्लज विभाग शेतकरी सर्व मोटरपंपधारक अन्याय निवारण समितीच्या वतीने कोल्हापूर पाटबंधारे मंडळ अधीक्षक अभियंता यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर पाटबंधारे विभागाचे दोन विभाग करुन गडहिंग्लज, आजरा, चंदगड, भुदरगड या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या व शासकीय कामाच्या सोयीसाठी कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) हा विभाग तयार करण्यात आला आहे. या विभागाअंतर्गत चित्री, चिकोत्रा, आंबेओहोळ, सर्फनाला घटप्रभा, जांबरे, जंगमहटट्टी, पाटगाव इत्यादी मध्यम प्रकल्प तसेच अनेक लघुप्रकल्प व कोल्हापूर बंधारे आहेत. या प्रकल्पामुळे सिंचन क्षेत्रात प्रचंड वाढ झालेली आहे. त्यामुळे प्रकल्पासंबंधीत व शेतकऱ्यांच्या सोयीच्या दृष्टीकोनातून गडहिंग्लज येथून सर्व कामे करणे अत्यंत सोयीस्कर आहे. त्यामुळे कोल्हापूर पाटबंधारे विभाग (दक्षिण) कार्यालय हे गडहिंग्लजला स्थलांतरीत होणे अत्यंत गरजेचे आहे.
हा विभाग गडहिंग्लज येथे करण्यासंदर्भात नियोजन असून तसा आराखडा तयार आहे. या विभागाकरीता लागणारी दोन-तीन एकर जागा विभागाच्या ताब्यातआहे. इमारतही तयार आहेत. थोडयाफार दुरुस्तीनंतर गडहिंग्लजमध्ये काम करु शकतात. गडहिंग्लजपासून चंदगड हे ५० किलोमीटर, आजरा ३०, भुदरगड ४०, मुरगुड २५ किलोमीटर अंतरावर आहे. तसेच गडहिंग्लज तालुका सर्व सोयीनियुक्त असल्यामुळे गडहिंग्लज पासून कार्यकारी अभियंता यांना कार्यक्षेत्राची पाहणी करणे व शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे अत्यंत सोपे होईल. सदर कार्यालय गडहिंग्लज येथे झाल्यास शासन व शेतकरी या दोघांचीही आर्थिक व वेळेची बचत होण्यास मदत होणार आहे.
या निवेदनावर अमृत शिंत्रे, प्रशांत देसाई, अमर चव्हाण, बाळगोंडा पाटील, सचिन जाधव, वसंत नाईक आदींच्या सह्या आहेत.