Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित आहे : कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के

गडहिंग्लजला शिवराज महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा जागर





गडहिंग्लज (प्रतिनिधी): राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे विद्यार्थी केंद्रित आहे. विद्यार्थी सर्वगुण संपन्न व्हावे यासाठी त्याची अमंलबजावणी करण्यात येत आहे. चाकोरी बाहेरच्या शिक्षणाची तरतूद नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये करण्यात आली आहे. नव्या राष्ट्रीय धोरणामध्ये विद्यार्थी सक्षम व रोजगारक्षम व्हावा याची तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना या नव्या शैक्षणिक व्यवस्थेत कौशल्यज्ञान मिळविण्याची संधी आहे. परिपूर्ण विद्यार्थी घडण्याची संधी आहे याचा लाभ विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी केले.



शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत गुणवत्ता हमी व गडहिंग्लज येथील शिवराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० स्कुल कनेक्ट अभियान' कार्यशाळेत ते बोलत होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते. सचिव डॉ. अनिलराव कुराडे व उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी केले. पाहुण्यांचा परिचय केमिस्ट्री विभाग डॉ. ए.एम. हसुरे यांनी करून दिला. कुंडीतील रोपट्याला मान्यवरांच्या हस्ते पाणी पालून व शिवाजी विद्यापीठ गौरव गीत गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांचा सत्कार अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व प्रा. कुराडे यांनी लिहिलेले ग्रंथ देऊन करण्यात आला.



यावेळी मार्गदर्शन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या २०२४-२०२५ वर्षापासून होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविधांगी कौशल्यपूर्ण ज्ञान घेऊन रोजगारक्षम व्हावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आजचा विद्यार्थी रोजगारक्षम तसेच इतरांना रोजगार देणारा झाला पाहिजे याचा या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्रामुख्याने विचार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपली भारतीय ज्ञान परंपरा अगाध आहे. त्याचा अंतर्भाव करून विद्यार्थी अधिक सक्षम व्हावा शिवाय आपला समाज ज्ञानाधीष्टीत झाला पाहिजे यासाठी हे शैक्षणिक अभियान का गरजेचे आहे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून या राष्ट्रीय धोरणाचा लाभ विद्यार्थ्यांना घेण्याचे आवाहन त्यांनी केले. आज उच्च शिक्षणाच्या प्रवाहात अधिकाधिक विद्यार्थी यावा यासाठी हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. १८ ते २३ वयोगटातील पन्नास टक्के विद्यार्थी उच्च शिक्षणात आली पाहिजे यासाठी या शिक्षणपद्धतीत बदल करून हे धोरण अमलात आणले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांनी अध्यक्षीय भाषणातून नव्या पिढीला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची, पालक-विद्यार्थी संवाद साधण्याची का गरज आहे हे सांगितले. विद्यार्थी सक्षम व्हावा यासाठी योग्य ते उपक्रम राबविण्याची गरज ओळखून आमचे प्रेरणास्थान शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कार्याचा वारसा आपण चालवित आहात असे सांगून त्यांनी धन्यवाद व्यक्त केले.




शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिलराव कुराडे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना सक्षम करणाऱ्या अभ्यासक्रमाची आज गरज आहे. नव्या अभ्यासक्रमाची गरज ओळखून विद्यार्थी हिताच्या अभ्यासक्रमांना परवानगी देण्यात यावी तसेच विद्यार्थी हिताचा विचार करून शिवराज विद्या संकुलासाठी आवश्यक असे सहकार्य करण्याची विनंती कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे केली.




या कार्यक्रमास प्रा.सौ. बिनादेवी कुराडे, डॉ. किरण पोतदार, नॅक समन्वयक प्रा. किशोर आदाटे, रजिष्ट्रार डॉ. संतोष शहापूरकर,    ग्रंथपाल संदीप कुराडे, पी.आर.ओ. विक्रम शिंदे यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अल्ताफहुसेन नाईकवाडे यांनी केले केले. आभार पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.