'भीक मागो आंदोलन' करत वेधले शासनाचे लक्ष
५० व्या दिवशीही कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच
गडहिंग्लज (प्रतिनिधी): गडहिंग्लजला अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी शहरातून 'भिक मागो आंदोलन' करत आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. आपल्या मागण्यांसाठी सलग ५० व्या दिवशी देखील अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. या आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी कर्मचारी सभेचे राज्य सचिव बाळेश नाईक करत आहेत.
'मानधन नको वेतन हवे' यासह आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी ४ डिसेंबर पासून संपावर आहेत. या संपामुळे अंगणवाड्याच बंद असल्याने लहान मुले घरातच आहेत. अंगणवाडीतील त्यांचा किलबिलाट थांबला आहे. गेले ५० दिवस झाले या आंदोलनावर शासनाकडून अद्याप तोडगा न निघाल्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. गडहिंग्लज तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी १५ जानेवारी रोजी तेरणी या गावातून आक्रोश मोर्चाचा प्रारंभ केला आहे. याद्वारे गावागावातील ग्रामपंचायतींवर हा आक्रोश मोर्चा नेत शासनाचे लक्ष वेधत आहेत. दरम्यान, आज गडहिंग्लज शहरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी 'भीक मागो आंदोलन' केले. शहरातील विविध ठिकाणी तसेच बसस्थानकावर भीक मागत आपल्या न्याय मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनात अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हा अध्यक्षा अंजना जाधव-शरबिद्रे, तालुकाध्यक्षा राजश्री बाबन्नावर, कार्याध्यक्ष सुरेखा गायकवाड यांच्यासह शोभा जाधव, वंदना साबळे, जयश्री खानापुरे, उषा मटकर, नंदा कुराडे, राजश्री स्वामी, सुरेखा नाईक, पार्वती सुरंगे, मालती थोरात, सरोजनी कलगुटगी, सुवर्णा चव्हाण, अंजली देसाई, माधवी देसाई, गीता खणदाळे, संगीता नांगनुरे, मंगल पाटील, कल्पना परीट, वंदना होडगे, कांचन जाधव यांच्यासह अंगणवाडी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.